महागाईने घेतला चिमुरडीचा बळी! पालनपोषण अवघड झाल्याने पित्याने केली लेकीची हत्या 

वाढत्या महागाईने सर्वांचेच जगणे असह्य केले आहे. या महागाईत पालनपोषणाचा खर्च परवडेनासा झाल्याने जन्मदात्याने चार महिन्यांच्या मुलीची दोरीने गळा आवळून हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. घाटकोपर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी आरोपी संजय कोकरेला अटक केली आहे.

कमी उत्पन्न आणि वाढती महागाई यात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले. या चिंतेने संजय कोकरेने त्याची चार महिन्यांची मुलगी श्रेया हिची हत्या केल्याचे उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संजय हा पत्नी व तीन मुलांसोबत घाटकोपरच्या कामराज नगरमध्ये राहतो. तो वेठबिगारीचे काम करतो. त्यातून कुटुंबाला सांभाळण्याइतपत पैसे मिळत नसल्याने संजय चिंतेत होता. शुक्रवारी सायंकाळी संजयची पत्नी शैला घरकामासाठी निघून गेली होती, तर दोन मुले घराबाहेर खेळत होती. याचदरम्यान घरात कोणी नसल्याचे पाहून संजयने पाळण्यातील श्रेयाची दोरीने गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर तिला पाळण्यात झोपवले. काही वेळाने घरी आलेल्या शैलाला मुलगी काहीच हालचाल करत नसल्याचे लक्षात आले. त्यावेळी संपूर्ण प्रकार उघड झाला. याची माहिती समजताच पंतनगर पोलीस घटनास्थळी आले आणि शैलाने दिलेल्या तक्रारीवरून संजयविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.