मुंबई-गोवा महामार्ग 17 वर्षांपासून ‘वर्क इन प्रोग्रेस’, जगातील सर्वाधिक काळ रखडलेला महामार्ग

दुर्गेश आखाडे, रत्नागिरी

जगातील सर्वाधिक काळ काम सुरू असलेला महामार्ग अशी ओळख ठरलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर आजही जागोजागी ‘वर्क इन प्रोग्रेस’चे बोर्ड पाहावयास मिळतात. तब्बल 17 वर्षे होऊनही अजून महामार्गाचे काम रखडलेलेच आहे. सुरुवातीला मुंबई-गोवा महामार्ग एक्स्प्रेस हायवे होईल असे स्वप्न होते. मात्र हे स्वप्न भंगले आणि मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणावर येऊन थांबला. त्यासाठीही कोकणवासीयांना तब्बल 17 वर्षांची वाट पाहावी लागली आहे. मुंबई-गोवा महामार्ग होण्यासाठी अजून किती काळ लागणार असा प्रश्न सध्या कोकणवासीयांना सतावतोय. गणपतीला महामार्ग पूर्ण होईल, डिसेंबरला महामार्ग पूर्ण होईल अशा राज्यकर्त्यांच्या घोषणांनी हवेत विरल्या आहेत. यंदाच्याही शिमग्याला गावी जाताना चाकरमान्यांचे कंबरडे मोडणार आहे. तसेच रस्त्यावरून जाताना धूळ खात घर गाठावे लागणार आहे.

 राष्ट्रीय महामार्गाला कार्यकारी अभियंताच नाही

मुंबई-गोवा महामार्गाचे काम ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे रखडलेले आहे. गेली अनेक वर्षे रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दिरंगाईने चाललेल्या महामार्गाच्या या कामात आणखी एक गोष्ट पुढे आली आहे. या राष्ट्रीय महामार्ग विभागाला गेले सात महिने कार्यकारी अभियंता नाही. गेले सात महिने या महामार्गाचा कारभार मुंबईतील प्रभारी अधिकाऱ्यामार्फत  सुरू आहे.