शेअर बाजार घोटाळा! माधवी बूच यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

‘सेबी’च्या अध्यक्षपदावरून दोन दिवसांपूर्वीच पायउतार झालेल्या माधवी बूच यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. शेअर बाजारातील पंपन्यांच्या ‘लिस्टिंग’मध्ये अफरातफर करून गुंतवणूकदारांच्या पैशांचा घपला केला. या घोटाळय़ातील सहभागप्रकरणी बूच यांच्यासह सेबी व शेअर बाजारातील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा आणि सर्व आरोपींची निष्पक्ष चौकशी करा, असे आदेश न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिले आहेत.

शेअर बाजार घोटाळ्याप्रकरणी पत्रकार सपन श्रीवास्तव यांनी तक्रार केली होती. मार्पेटमध्ये नोंदणीसाठी निर्धारित नियमांची पूर्तता न करणाऱ्या पंपन्यांना सेबीच्या अधिकाऱ्यांनी घोटाळा करण्यास रान मोकळे करून दिले, असा आरोप तक्रारीत केला आहे. त्याची गंभीर दखल विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी घेतली आणि एसीबीला सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी बूच यांच्यासह अश्वनी भाटिया, कमलेश चंद्रा वार्ष्णेय, अनंत नारायण जी, बीएसईचे अध्यक्ष प्रमोद अगरवाल आणि सीईओ सुंदररमण रामामूर्ती या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवून 30 दिवसांत चौकशी करण्याचे आदेश दिले. माधवी बूच यांना अध्यक्षपदावरून पायउतार होताच न्यायालयाकडून हा जबरदस्त झटका मिळाला आहे.

माधवी बूच यांची वादग्रस्त कारकीर्द

n माधवी बूच यांचा कार्यकाल शेवटच्या वर्षात अधिक वादग्रस्त ठरला. त्यांच्या कामकाजातील मनमानी कारभाराविरुद्ध सेबीच्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन केले होते.

n गेल्या वर्षी ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने माधवी बूच व त्यांचे पती धवल बूच यांच्या गैरकारभाराची पोलखोल केली होती. बूच दाम्पत्याची अदानी समूहाच्या पंपनीत भागीदारी असल्याचा तसेच बूच दाम्पत्याने विदेशातील पंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचा खळबळजनक आरोप ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने केला होता.

न्यायालय म्हणाले

शेअर बाजारातील घोटाळय़ाच्या तक्रारीसोबत जोडलेले पुरावे तपासले असता माधवी बूच व इतर वरिष्ठ अध़िकाऱ्यांचा घोटाळय़ातील सहभाग दिसून येत आहे. नियामक त्रुटी व घोटाळेखोर कंपन्या, सेबी, बीएसई यांच्यातील संगनमत त्यातून उघडकीस येत आहे. आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित आरोपींविरुद्ध वेळीच गुन्हे दाखल करून सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.