मुंबईत शिवसैनिकांचे ठिकठिकाणी जोरदार आंदोलन, योगेश कदम राजीनामा द्या!

पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात झालेल्या बलात्काराने महाराष्ट्रासह देश हादरून गेला असताना या प्रकरणाची माहिती माध्यमांना देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पीडित तरुणीबद्दल अत्यंत असंवेदनशील आणि बेताल असे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्याविरोधात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून शिवसेनेच्या वतीनेही मुंबईत ठिकठिकाणी जोरदार आंदोलन करण्यात आले. आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या योगेश कदम यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत शिवसैनिकांनी कदम यांचा ठिकठिकाणी निषेध केला.

पुण्यात आलेल्या तरुणीवरील बलात्कारानंतर गृह राज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांनी पुण्याचा दौरा करून पोलिसांकडून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात पोलीस दोषी नसल्याचे सांगत पोलिसांची पाठराखण केली. त्याचबरोबर बलात्कारित तरुणीने बलात्कारावेळी कोणत्याही प्रकारचा प्रतिकार केला नाही, असे बेताल वक्तव्यही केले. योगेश कदम यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे.

विभाग क्रमांक 2 च्या वतीने विभागप्रमुख अजित भंडारी व महिला विभाग संघटक मनाली चौकीदार यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली पूर्व रेल्वे स्थानक येथे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा निषेध करण्यात आला. यावेळी विभागप्रमुख अजित भंडारी विधानसभा प्रमुख संतोष राणे, अशोक पटेल, विधानसभा समन्वयक प्रमुख अ‍ॅड. कमलेश यादव, विधानसभा संघटक पृष्णा मुळीक, विकास दशपुते, गणेश गुरव, राजेश सकपाळ, राजेद्र निकम, शुभांगी शिंदे, सुषमा कदम, रवींद्र वेदपाठक, प्रशांत कोकणे उपस्थित होते.

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निषेधार्थ जोगेश्वरी येथे शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. महिला सुरक्षेबाबत सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना आमदार बाळा नर यांनी केली. यावेळी विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत, उपनेत्या व सिनेट सदस्या शीतल देवरुखकर, महिला संघटक  शालिनी सावंत, विधानसभा समन्वयक रवींद्र साळवी, विधानसभेचे सर्व महिला-पुरुष पदाधिकारी, युवासेना, व्यापार विभाग, ग्राहक संरक्षण कक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला-पुरुष कार्यकर्ते, शिवसैनिक, जोगेश्वरीतील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शिवसेना विभाग क्रमांक 1 च्या वतीने गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा निषेध करून कदम यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, उपनेत्या संजना घाडी, माजी आमदार विलास पोतनीस, विधानसभा प्रमुख अशोक म्हामुणकर, सिनेट सदस्य शशिकांत झोरे, माजी नगरसेवक योगेश भोईर, चेतन कदम, पांडुरंग देसाई उपस्थित होते. विभागप्रमुख उदेश पाटेकर, महिला विभाग संघटक शुभदा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.