
राज्याचे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असलेले प्रभादेवी येथील पु. ल. कला अकादमी आणि रवींद्र नाटय़मंदिर दीड वर्षाने आज पुन्हा गजबजले. रंगमंचावर घंटानाद करून मुंबईची कलापंढरी सुरू झाल्याची नांदी देण्यात आली. त्याला टाळय़ांच्या कडकडाटात रसिकांनी प्रतिसाद दिला. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडणारा ‘पुल’ नव्याने साधला गेला. केवळ नाटकच नव्हे तर आता चित्रपटांचाही आनंद नूतनीकृत वास्तूत घेता येणार आहे.
प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाचे लोकार्पण आज झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, शिवेंद्रराजे भोसले, आशीष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुलंचे पुतणे जयंत देशपांडे यांच्या उपस्थितीत कोनशिला अनावरण झाले. यानिमित्ताने कला अकादमीच्या नव्या वास्तूत कलारसिकांची पावलं पडली. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या हस्ते स्टेजची पूजा करण्यात आली. सोनिया परचुरे आणि टीम, सुभाष नकाशे, गायक नंदेश उमप, रोहन पाटील आदी कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. अभिनेते संजय मोने, पुष्कर श्रोत्री, उत्तरा मोने यांनी सूत्रसंचालन केले.
मिनी थिएटरमध्ये मोफत मॅटिनी शो
पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या तिसऱ्या मजल्यावरील अत्याधुनिक मिनी थिएटरचे आज उद्घाटन झाले. डॉल्बी एटमॉसचे महाराष्ट्रातले हे पहिले थिएटर आहे. सिनेमा तंत्रज्ञ उज्ज्वल निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉल्बी थिएटर बनवले आहे.
एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव
रवींद्र नाटय़मंदिरात 21 ते 24 एप्रिलदरम्यान आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकार असा चित्रपट महोत्सव पहिल्यांदा आयोजित करत आहे.