
महाकुंभातील पाणी आंघोळीसाठी आणि पिण्यासाठीही योग्य असल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत आणि प्रसारमाध्यमांसमोरही ठासून केला, परंतु आता बिहार सरकारनेही बिहार प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हवाला देत गंगेचे पाणी आंघोळीसाठी योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नितीश कुमार सरकार आणि योगी आदित्यनाथ सरकार आता आमने सामने आले आहे.
बिहारमध्ये गंगा नदीचे पाणी विविध ठिकणी आंघोळ करण्यायोग्य नसून या पाण्यात मोठय़ा प्रमाणावर बॅक्टेरिया असल्याचे बिहारच्या 2024-25 च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. बिहारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यभरातील गंगा नदीच्या 34 ठिकाणांवरील पाण्याचा दर्जा तपासला. त्यातून ही बाब समोर आली. बिहार राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल विधानसभेत नुकताच सादर करण्यात आला. गंगा नदीच्या पाण्यात कॉलिफॉर्म आणि फेकल कॉलिफॉर्म हे मानवी विष्ठेतील जिवाणू असून त्यांचे प्रमाण प्रचंड आहे. शहरातून गंगा नदीत सोडण्यात आलेले सांडपाणी आणि इतर कचरा यामुळे गंगा नदीचे पाणी प्रचंड प्रदूषित झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.