यंदाचा उन्हाळा ठरणार प्रचंड ‘ताप’दायक; पुढचे तीन महिने सूर्य आग ओकणार, अनेक राज्यांत तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार

उकाडय़ाने फेब्रुवारीपासूनच हैराण केले आहे. तापमानात पुन्हा घट कधी होणार, याची प्रतीक्षा नागरिक करीत आहेत. याचदरम्यान हवामान खात्याने यंदाचा उन्हाळा प्रचंड तापदायक असेल, असे भाकीत केले आहे. पुढील तीन महिने उन्हाचे असह्य चटके बसतील, महाराष्ट्रासह बहुतांश राज्यांत तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील, सूर्य जणू आग ओकत असल्याची परिस्थिती असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

फेब्रुवारीच्या अखेरीपासून उकाडय़ात मोठी वाढ झाली आहे. मार्च महिन्यात तर तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उन्हाळय़ात ‘एल-निनो’ स्थिती तटस्थ होणार असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांत उन्हाळा तीव्र बनणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. फेब्रुवारीमध्ये देशाचे किमान तापमानदेखील सरासरीपेक्षा अधिक नोंद झाले. 1901 नंतरच्या नोंदीनुसार यंदाच्या फेब्रुवारीत सरासरीपेक्षा अधिक किमान तापमान नोंद झाले. देशात 15.02 अंश सरासरी किमान तापमान नोंदवले गेले. यापूर्वी 2016 मध्ये सर्वाधिक 14.91 अंश किमान तापमान नोंद झाले होते. किमान तापमानाप्रमाणेच फेब्रुवारीत नोंद झालेले 29.07 अंश हे सरासरी कमाल तापमान दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान ठरले. दोन वर्षांपूर्वी फेब्रुवारीत 29.44 अंश सर्वोच्च कमाल तापमानाची नोंद झाली होती. तापमानाची हीच दाहकता मार्चमध्ये कायम राहणार आहे. किंबहुना, मे अखेरीपर्यंत देशाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा अधिक कमाल आणि किमान तापमान नोंद होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

या राज्यांत येणार उष्णतेच्या लाटा

महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हरयाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक.

मुंबईत आठवडाभर पारा 37 अंशांवर

मुंबईत उन्हाचा रखरखाट कायम राहिला असून त्यापासून लवकर दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. रविवारी सांताक्रुझमध्ये सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक म्हणजेच 35.1 अंश इतके कमाल तापमान नोंद झाले. पुढील आठवडाभर शहरातील कमाल तापमान 37 अंशांच्या वर नोंद होईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.