साखळीत हिंदुस्थान चॅम्पियन, विजयाच्या हॅटट्रिकसह हिंदुस्थान साखळीत अपराजित; उपांत्य लढतीत हिंदुस्थानसमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान

चॅम्पियन्स ट्रॉफीचे चॅम्पियन होण्याच्या दिशेने धाव घेणाऱ्या हिंदुस्थानने न्यूझीलंडचा 44 धावांनी सहज पराभव करत विजय हॅटट्रिक साजरी केली. सोबत साखळीत आणि गटात अपराजित राहात चॅम्पियन होण्याचा मानही मिळवला. गटसाखळीत झालेल्या सामन्यात एकमेव हिंदुस्थानचाच संघ सलग तीन विजयांसह अपराजित राहिला आहे आणि सर्वाधिक सहा गुण मिळवणारा अव्वल संघ ठरला आहे. त्यामुळे आता मंगळवारी पहिल्या उपांत्य लढतीत हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियाशी भिडेल, तर बुधवारी दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया यांच्यात लाहोरमध्ये दुसरा उपांत्य सामना रंगेल.

श्रेयस अय्यरच्या तडाखेबंद  79 धावा आणि त्याने अक्षर पटेलसह (42) चौथ्या विकेटसाठी केलेली  98 धावांची भागी आणि तळाला हार्दिक पंडय़ाने ठोकलेल्या 45 धावांमुळे हिंदुस्थानने 9 बाद 249 अशी मजल मारली होती. तर प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडचा अर्धा संघ 42 धावांत गुंडाळत त्यांचा डाव 205 धावांतच संपवला. तोच हिंदुस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

वरुणने घेतली न्यूझीलंडची फिरकी

हिंदुस्थानने 249 या सामान्य धावसंख्येचा यशस्वी बचाव करताना न्यूझीलंडला 45.3 षटकांत 205 धावांवर रोखले. त्यांच्याकडून अनुभवी केन विल्यम्सनने 120 चेंडूंत 7 चौकारांसह 81 धावांची भागीदारी करीत एकाकी झुंज दिली. कर्णधार मिचेल सॅण्टनर 28 धावांवर बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा पराभव अधोरेखीत झाला. हिंदुस्थानकडून वरुण चक्रवर्तीने पाच फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. पुलदीप यादवने 2 विकेट टिपले, तर हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल व रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

अय्यरचे अर्धशतक; अक्षर, हार्दिकचा प्रतिकार

आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीने हिंदुस्थानचा डाव सावरला. श्रेयस अय्यर (79) व अक्षर पटेल (42) यांनी चौथ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. रचिन रवींद्रने अक्षरला विल्यम्सनकरवी झेलबाद करून ही जोडी पह्डली. त्यानंतर श्रेयस आणि आलेला लोकेश राहुल यांनी धावफलक हलत ठेवला. श्रेयसचे आज शतक होणार असे वाटत असतानाच विल ओ’रूर्पेने त्याला यंगकरवी झेलबाद करून न्यूझीलंडला पाचवे यश मिळवून दिले. श्रेयसने 98 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह आपली अर्धशतकी खेळी सजविली. मग मिचेल सॅण्टनरने राहुलला (23) यष्टीमागे लॅथमकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला सहावा धक्का दिला. त्यानंतर हार्दिक पंडय़ा (45) व रवींद्र जाडेजा (16) यांनी हिंदुस्थानला 249 धावसंख्येपर्यंत पोहोचविण्यात योगदान दिले. हार्दिकने 45 चेंडूंत तितक्याच धावा करताना 4 चौकार व 2 षटकार ठोकले. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक 5 बळी टिपले. जेमिसन, ओ’रूर्प, सॅण्टनर, रचिन यांनी प्रत्येकी एक फलंदाज  बाद केला.

हिंदुस्थानची आघाडीची फळी अपयशी

सलग दहाव्यांदा नाणेफेकीचा कौल गमावून टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 249 अशी साधारण धावसंख्या उभारली. मॅट हेन्रीने शुभमन गिलला अवघ्या 2 धावांवर पायचीत करत न्यूझीलंडला आश्वासक सुरुवात करून दिली. मग कर्णधार रोहित शर्माही 17 चेंडूंत 15 धावा काढून बाद झाला. त्याला काईल जेमिल्सनने यंगकरवी झेलबाद केले. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकणारा विराट कोहली केवळ 11 धावा काढून माघारी परतला. हेन्रीच्या गोलंजीवर ग्लेन फिलिप्सने हवेत सूर मारून विराटचा अफलातून झेल टिपला. आघाडीची फळी अपयशी ठरल्याने टीम इंडियाची 6.4 षटकांत 3 बाद 30 अशी दुर्दशा झाली होती.