Pune News – ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेचे तीनतेरा, ही परिस्थिती कधी सुधारणार? ग्रामस्थांचा संतप्त सवाल

इंदापूर तालुक्याच्या शेजारीच असलेले काटेवाडी (ता.बारामती) गावाला काही वर्षांपूर्वी निर्मल ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकीकडे काटेवाडी गावामध्ये ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने स्वच्छतेबाबत चे सर्व नियम पाळले जातात. दुसरीकडे इंदापूर तालुक्यातील सणसर ग्रामपंचायत परिसरात गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.

शासनाने गेल्या काही वर्षांपासून “स्वच्छ भारत मिशन ग्रामीण” या नावाने योजना देखील सुरू केली. दि. 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत अनेक तालुक्यांमध्ये शहरांमधील कचरा, साफसफाई, शौचालय बांधणे जीवनातील सामान्य गुणवत्ता सुधारण्याचे उद्दिष्ट 2019 पर्यंत होते. मात्र पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण तालुक्यांमध्ये “स्वच्छ भारत मिशन” पोहोचलेच नसल्याचा आरोप अनेक ग्रामपंचायतींनी केला आहे. आजही रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. अजूनही ग्रामीण भागामध्ये अनेकांनी कचराकुंड्या देखील पाहिलेल्या नाहीत. अनेक ग्रामपंचायतीच्या नाकारतेपणामुळे, अस्वच्छतेमुळे लहान मुले, वृद्ध, आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक ग्रामपंचायतींना कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी दिलेल्या आहेत. मात्र गाड्यांचा वापर कचरा गोळा करण्यासाठी न होता विविध कामांसाठी होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

अनेक गावांमध्ये डासांचे प्रमाण, अस्वच्छता, दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे गावागावात अनेक आजार पसरण्याची ग्रामस्थांनी भीती व्यक्त केली आहे. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना अनेक ग्रामपंचायती व आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. गावागावांमध्ये स्वच्छ भारत मिशन पोहोचवण्याचे काम लाखो रुपये खर्च करून शासन करीत असले, तरी देखील तळागाळापर्यंत या योजना पोहचतच नाहीत. मात्र शासनाने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये लक्ष केंद्रित करून अनेक ग्रामपंचायतींची जनजागृती केली पाहिजे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.