
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी विविध आशयाच्या मजेशीर रिल्स बनवल्या जातात. गेल्या काही दिवसांमध्ये पोलीस गणवेशात रिल्स बनवण्याऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. परंतु आता याला आळा बसण्याची शक्यता आहे. कारण सोशल मीडियावर रिल्स बनवणे एका महिला पोलीस अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. गणवेशात रिल्स बनवल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांचे थेट निलंबन करण्यात आले आहे.
पोलिसांच्या गणवेशात रिल्स किंवा व्हिडीओ बनवण्यास बिहार पोलीस मुख्यालयाने सक्त मनाई केली आहे. तसेच या नियमाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशा इशाराही देण्यात आला होता. असे असताना एका महिला पोलीस अधिकाऱ्याने पोलीस गणवेशात कर्तव्यावर असताना अनेक रिल्स बनवल्या. त्यांच्या अनेक रिल्स व्हायरलही झाल्या. त्यामुळे पोलीस मुख्यालयाने त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली आहे.
पोलीस अधिक्षक स्वर्ण प्रभात यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्या म्हणल्या की, कर्तव्य बजावत असताना मोबाईल फोनचा वापर करने, गणवेशात रिल्स बनवने पूर्णपणे प्रतिबंधित आहे. या सर्व प्रकारावर पोलीस मुख्यालयाद्वारे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे या नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. संबंधित महिला पोलिसाला तत्काळ निलंबित करण्यात आले असून व्हायरल व्हिडीओंचा तपास सुरू आहे. इंडिया टीव्हीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.