
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजप नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी भर रस्त्यात छेड काढली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
याबाबत दोन दिवसांपूर्वी तक्रार करून कोणावरही कारवाई केली नाही म्हणून रक्षा खडसे यांनी पोलीस स्थानक गाठत अधिकाऱ्यांसमोर आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, यामुळे शिंदे-फडणवीसांच्या राज्यात सर्वसामान्य घरातील लाडक्या बहिणीच नाही तर सत्ताधारी मंत्र्यांच्या मुलीही असुरक्षित असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, महाशिवरात्रीनिमित्त मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रा भरते. या यात्रेत फराळ वाटप करत असताना रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आली. टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. त्यानंतर सायंकाळी सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबासह यात्रेत फिरत असतानाही याच टवाळखोरांनी तिचे फोटो, व्हिडीओ काढले. सुरक्षा रक्षकाने मज्जाव केला असता टवाळखोरांनी त्यांच्यासोबत झटापट केली.
महाराष्ट्रात नक्की चाललंय काय?
भाजप नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी भर रस्त्यात छेड काढली आहे. दोन दिवसांपूर्वी तक्रार करूनही कारवाई नाही. रक्षा खडसेंनी पोलीस स्थानक गाठत अधिकाऱ्यांना विचारला जाब. pic.twitter.com/t7nGZYKWrx
— Saamana Online (@SaamanaOnline) March 2, 2025
रक्षा खडसेंची पोलीस स्थानकात धाव
दोन दिवसांपूर्वी तक्रार करूनही आरोपींविरोधात कुठलीही कारवाई झालेली नाही, त्यामुळे रक्षा खडसे यांनी थेट पोलीस स्थानकात धाव घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला. हा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न असून आरोपी कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या जवळचा असला तरी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मुलींनी ज्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कोर्टाच्या माध्यमातूनही जामीन मिळवू न देण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावे. पोलीस वर्दीमध्ये असतानाही त्यांना मारण्याची हिंमत कशी होते? असा सवाल करत हे अति झाले असून याला आळा बसणे गरजेचे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली.
गुन्हा दाखल
दरम्यान, 28 फेब्रुवारी रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेदरम्यान रक्षा खडसे यांच्या मुलीसह तीन-चार मुलींची छेड काढण्यात आली. चार ते पाच जणांनी त्यांची छेड काढत विनयभंग केला. या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.