तानसातील इको सेन्सेटिव्ह झोनविरोधात हरकतींचा पाऊस

तानसा अभयारण्याचा इको सेन्सेटिव्ह झोन 1 ते 9 किलोमीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णय हा या भागातील शेती व्यवसाय उद्ध्वस्त करणारा आहे. जर शासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर झाला तर शहापूर तालुक्यातील लाहे, कानविदे, कळमगाव, उंबरखाड, पळशीन, शिरोळ, बिरवाडी, पेंढारी, पिंपळपाडा आणि वरसकोळ गावातील शेतकरी आणि व्यावसायिक देशोधडीला लागणार आहेत. त्यांना आपल्या शेतीचा आणि शेतीपूरक व्यवसाय बंद करावा लागणार आहे. घराचे बांधकाम करण्यासाठी एक वीटही रचता येणार नाही. त्यामुळे तानसाचा इको सेन्सेटिव्ह झोन फक्त 100 मीटरपर्यंत लागू करण्यासाठी शेतकऱ्यांनी हरकतींचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.

शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यालगत जमीन असणाऱ्या व इको सेन्सेटिव्ह झोनसंदर्भात हरकत घेतलेल्या 119 शेतकऱ्यांना वनविभागाने जमिनीचा स्थळ पंचनामा करण्यासाठी हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने 7 मे 2024 रोजी तानसा अभयारण्याचा इको सेन्सेटिव्ह झोन ९ किलोमीटरपर्यंत वाढवण्याची अधिसूचना काढली होती. इतका मोठा परिसर जर इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये आला तर या भागातील वीटभट्टी, विहिरी, बोअरवेल, बांधकाम, खाणकाम, स्टोन क्रशर, गृहप्रकल्प, कारखाने, लघुउद्योग, शेती, शेतीपूरक व्यवसाय, कुक्कुटपालन यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रस्तावावर शहापूर तालुक्यातील लाहे, कानविदे, कळमगाव, उंबरखाड, पळशीन, शिरोळ, बिरवाडी, पेंढारी, पिंपळपाडा व वरसकोळ येथील 119 शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आणि हरकती घेतल्या. इको सेन्सेटिव्ह झोनचे अंतर १०० मीटर करावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

सकारात्मक अहवाल पाठवा

तानसा अभयारण्याचा इको सेन्सेटिव्ह झोन जर अधिसूचनेनुसार वाढला तर त्याचा मोठा फटका शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या आहेत त्यांची जमीन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहावी. तिथे सुरू असलेले व्यवसाय आणि त्या शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे साधन यांचा विचार करून सकारात्मक अहवाल शासनाला पाठवावा, अशी मागणी शहापूर तालुका शेतकरी संघर्ष समिती अॅड. निखिल खाडे आणि विठ्ठल भोईर यांनी केली आहे.