मणिपूरमधील सर्व बंद रस्ते 8 मार्चपासून खुले करा, अमित शहांचे आदेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 8 मार्चपासून मणिपूरमधील सर्व बंद रस्ते खुले करण्याचे आदेश शनिवारी दिले आहेत. राज्यातील सुरक्षेच्या परिस्थितीबाबत बैठकीचे अध्यक्षस्थान शहा यांनी भूषवले. रस्त्यांवर अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

हिंसाचाराच्या आगीने होरपळत असलेल्या मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर अशा प्रकारची ही पहिलीच बैठक पार पडली. मे 2023 पासून सुरू असलेल्या राज्यातील हिंसाचारात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी या बैठकीतून राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. राज्यपाल अजय कुमार भल्ला, मणिपूर सरकारचे उच्च अधिकारी, लष्कर, निमलष्करी दलाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर 13 फेब्रुवारी रोजी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.