
तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरात शुद्ध रिफायनरी केलेले केवळ ब्रँडेड खाद्योपयोगी तेलानेच शनि देवाला अभिषेक व अर्पण करण्याची अंमलबजावणी शनिवार पासून सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयामुळे सुट्ट्या व भेसळयुक्त तेलामुळे होणारी मूर्तीची झीज थांबणार आहे, असा विश्वास विश्वस्तांनी व्यक्त केला आहे.
शनेश्वर देवस्थान व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामसभेत शनिमूर्तीला फक्त ब्रँडेड तेलानेच अभिषेक करण्याचा ठराव मंजूर करून त्याची एक मार्चपासून अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले होते. या संदर्भात देवस्थानकडून खासगी व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
एक मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून, आज पहाटेच्या शनिआरतीनंतर शनिमूर्तीला केवळ ब्रँडेड तेलाचाच अभिषेक करण्यात आला. भाविकांनीही या निर्णयाला जोरदार प्रतिसाद दिला असून, मूर्तीवर शुद्ध रिफायनरी व खाद्योपयोगी तेलच अर्पण केले जात आहे.
शनिशिंगणापुरात शनिमहाराजांच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतून भाविकांची संख्या मोठी असते. शनिची ‘इडा पिडा टळो’ यासाठी हजारो भाविक दररोज दाखल होतात. येथे तेल अभिषेकालाच महत्त्व असल्याने येथे लाखो लिटर तेल शनिमूर्तीवर अर्पण केले जाते.
पूर्वी सुट्टे पाऊच, भेसळयुक्त तेलामुळे शनिमूर्तीवर परिणाम होत असून, भेसळयुक्त तेलामुळे मूर्तीची पृष्ठभागाची झीज होत असल्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे शनेश्वर देवस्थान समितीने कठोर निर्णय घेतला आहे. आता यापुढे शनिमूर्तीवर फक्त ब्रँडेड तेल अर्पण करण्यात येणार आहे. दरम्यान, भाविकांनी सुट्टया तेलाची बाटली अगर पाऊच आणल्यास त्या भक्ताला अभिषेकास परवानगी मिळणार नाही, असा नियम करण्यात आला आहे. तसा प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देवस्थानने दिला आहे.
“शनि देवाला ब्रँडेड तेलानेच अभिषेक करण्याच्या ठरावाची आजपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तेलामध्ये नामांकित कंपनीचे व्हेजिटेरियनमधील करडी, शेंगदाणा, सोयाबीनचे तेल तसेच त्यावर एक्सपायरी डेट असणाऱ्या नामवंत कंपनीच्या तेलाचा वापर होणे आवश्यक असल्याच्या सूचना मंदिर परिसरात दिल्या आहेत. या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केल्याचे दिसत आहे.”
आप्पासाहेब शेटे सर, चिटणीस शनेश्वर देवस्थान