दक्षिण आफ्रिकेची उपांत्य फेरीत धडक, इंग्लंडचा दारुण पराभव करत ऑस्ट्रेलियाला टाकले मागे

दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा सात गडी आणि 19.5 षटके राखून दारुण पराभव करीत ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ‘ब’ गटात अखेरच्या लढतीनंतर उपांत्य फेरीचा सस्पेन्स संपला. या गटात दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या लढतीत दणदणीत मिळवीत ऑस्ट्रेलियाला गुणतक्त्यात मागे टाकले, हे विशेष. मात्र, उपांत्य फेरीत कोणते संघ आमनेसामने असतील, हा तिढा उद्या रविवारी होणाऱ्या हिंदुस्थान-न्यूझीलंड लढतीनंतरच सुटणार आहे.

इंग्लंडकडून मिळालेले 180 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने २९.१ षटकांत केवळ तीन फलंदाजांच्या मोबदल्यात 181 धावा करून सहज पूर्ण केले. जोफ्रा आर्चरने ट्रिस्टन स्टब्सचा भोपळाही फोडू न देता त्रिफळा उडवून इंग्लंडला सनसनाटी सुरुवात करून दिली होती. मग आर्चरने दुसरा सलामीवीर रायन रिकेल्टन (27) याचाही त्रिफळा उडवून दक्षिण आफ्रिकेची 2 बाद 47 अशी स्थिती केली.

मात्र, त्यानंतर रॅसी वॅन डर ड्युसेन (नाबाद 72) व हेन्रिक क्लासेन (64) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी करीत सामना एकतर्फी केला. विजयासाठी 6 धावांची गरज असताना क्लासेन बाद झाला. त्याला आदिल राशीदने महमुदकरवी झेलबाद केले. मग ड्युसेनने आलेल्या डेव्हिड मिलरच्या (नाबाद 7) साथीत दक्षिण आफ्रिकेच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

इंग्लिश फलंदाजांची शरणागती

त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव 38.2 षटकांत 179 धावांवर गारद झाला. ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’तील आव्हान आधीच संपुष्टात आल्याने इंग्लिश फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेपुढे सपशेल शरणागती पत्करली. त्यांच्याकडून जो रूट (37) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. याचबरोबर बेन डकेट (24), कर्णधार जोस बटलर (21) व जोफ्रा आर्चर (25) हे इतर धावांची ‘विशी’ ओलांडणारे फलंदाज ठरले. शिवाय दक्षिण आफ्रिकेने 18 धावांची अवांतर खुराक दिली म्हणून इंग्लंडला पावणेदोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जान्सेन व विआन मुल्डर यांनी 3-3 फलंदाज बाद केले. केशव महाराजला 2, तर लुंगी एनगिडी व कॅगिसो रबाडा यांना 1-1 बळी मिळाला.