
नशिबाच्या जोरावर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची बाद फेरी गाठणाऱ्या विदर्भाची अंतिम लढतीत मात्र जादू चालली नाही. विदर्भान करुण नायरच्या नाबाद शतकी फायरच्या जोरावर या सामन्यावर मजबूत पकड मिळविली असून, तिसऱ्या विजेतेपदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे. विदर्भाने दुसऱ्या डावात 4 बाद 249 धावसंख्येपर्यंत मजल मारली असून, चौथ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा करुण नायर 132, तर कर्णधार अक्षय वाडकर 4 धावांवर खेळत होते.
विदर्भाने 379 धावसंख्या उभारल्यानंतर केरळला 342 धावांवर रोखून पहिल्या डावात 37 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर चौथ्या दिवशी विदर्भाने 90 षटकांत 4 बाद 249 धावसंख्येपर्यंत मजल मारून आपली आघाडी 286 धावांपर्यंत वाढविली. पार्थ रेखाडे (1) व ध्रुव शोरी (5) या विदर्भाच्या सलामीच्या जोडीला 7 धावांत तंबूत धाडून केरळने आशा पल्लवीत केल्या होत्या. दानिश मालेवार (73) व करूण नायर (खेळत आहे 132) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 182 धावांची भागीदारी करून विदर्भाला सावरले.
मालेवारने 162 चेंडूंच्या संयमी खेळीत 5 चौकार लगावले. अक्षय चंद्रनने त्याला सचिन बेबीकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. मग आदित्य सरवटेने आलेल्या यश राठोडला (24) पायचित पकडून केरळला चौथे यश मिळवून दिले. करूण नायरने 280 चेंडूंच्या मॅरेथॉन खेळीत 10 चौकार व 2 षटकारांसह आपली नाबाद खेळी सजविली. केरळकडून एमडी निशीध, जलाज सक्सेना, आदित्य सरवटे व अक्षय चंद्रन यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.