
हिंदुस्थान आणि न्यूझीलंड या ‘अ’ गटातील संघांनी लागोपाठच्या विजयासह सर्वांत आधी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेली आहे. आता उभय संघ रविवारी अखेरच्या गटफेरीतील लढतीत भिडणार आहेत. दोन्ही संघांच्या खात्यात 4-4 गुण असून, सरस नेट रनरेटच्या जोरावर न्यूझीलंड अव्वल, तर हिंदुस्थान दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे उभय संघांमध्ये होणारी लढत म्हणजे अव्वल स्थानासाठी रस्सीखेच असणार आहे.
हिंदुस्थान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आधीच उपांत्य फेरी गाठलेली असल्याने त्यांच्या अंतिम 11 खेळाडूंच्या संघांमध्ये बदल होऊ शकतो. काही खेळाडूंनाश्रांती देऊन उपांत्य फेरीसाठी ताजेतवाने ठेवण्यासाठी रविवारच्या लढतीत बाकावर बसलेल्या खेळाडूंना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 118 एकदिवसीय लढती झाल्या असून, हिंदुस्थानने 60, तर न्यूझीलंडने 50 लढती जिंकल्या आहेत. सात लढतींचा निकाल लागू शकला नाही, तर एक लढत बरोबरीत सुटलेली आहे. ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’ मध्ये दोन्ही संघ एकदाच आमनेसामने आले होते. यात न्यूझीलंडने बाजी मारली होती. याचबरोबर आयसीसी वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थान आणि न्यूझीलंड हे 11 वेळा एकमेकांना भिडले असून, यात दोन्ही संघांनी 5-5 विजय मिळविले असून, एका लढतीचा निकाल लागू शकलेला नाही. त्यामुळे उभय संघांत आज एक तुल्यबळ लढत अपेक्षित आहे.
हिंदुस्थान – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड – मिशेल सॅण्टनर (कर्णधार), मार्क चॅपमन, डेवोन कॉन्वे, माइकल ब्रेसवेल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, लॉकी फर्ग्यूसन, विल ओ’ रुर्के, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, केन विल्यम्सन, विल यंग, जेकब डफी.