
दहावी, बारावीच्या परीक्षा घेणारे शिक्षण मंडळच आहे का टवाळांचा बाजार! असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. कॉपीमुक्तीचा बाजार गजबजलेला असतानाच शनिवारी बीडमधील धारूरात केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, पोलीस, बैठे, भरारी पथकांच्या नाकावर टिच्चून दोन विद्यार्थी चक्क इंग्रजीचा पेपर घेऊन पळाले! अर्ध्या तासाच्या आत पोलिसांनी या दोन्ही पेपररफोड्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून पेपर जप्त केला.
शनिवारी दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. जिल्हा परिषद केंद्रावर व्यवस्थित पेपर सुरू झाला. अर्ध्या तासानंतर एका हॉलमधून खिडकीतून उडी मारून दोन विद्यार्थी पेपर घेऊन पळाले. त्यामुळे खळबळ उडाली. पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी धावपळ करून पेपर फोडणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पेपरही ताब्यात घेण्यात आला. पेपर फोडणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे धारूरचे शिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांनी सांगितले.
भंडाऱ्यात इंग्रजीचा पेपर फोडणाऱ्या मुख्याध्यापकासह सहाय्यक शिक्षकाला अटक
भंडाऱ्यात दहावीचा इंग्रजीचा पेपर फोडल्याप्रकरणी बारव्हा येथील महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विशाल फुले (41) आणि सहाय्यक शिक्षक दीपक मेश्राम (35) यांना अटक करण्यात आली आहे. फरार मयूर टेंभरे याला शोधण्यासाठी भंडारा पोलिसांचे पथक गोंदियाकडे रवाना झाले आहे. परीक्षा केंद्र बदलल्याचा राग मनात धरून आकसापोटी आरोपींनी इंग्रजीचा पेपर सुरू होताच प्रश्नपत्रिका त्यांच्या व्हॉट्सअॅपवर घेत समाजमाध्यमावर व्हायरल केली होती. महात्मा गांधी विद्यालय बारव्हा या शाळेला अगोदर दहावीचे परीक्षा केंद्र होते. मात्र, शाळेजवळ बिअर बार असल्याने येथील परीक्षा केंद्र रद्द केले गेले.
बुरखा घातल्याने दहावी परीक्षेस प्रवेशास नकार
बिजलीनगर, चिंचवड परिसरात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेकरिता निगडी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत केंद्र आले आहे. ती विद्यार्थिनी शनिवारी सकाळी परीक्षा देण्यासाठी शाळेत गेली. मात्र, तिने बुरखा घातला असल्याने शाळेने तिला वर्गात जाण्यासाठी मज्जाव केला. अखेर तिच्या पालकांनी पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. निगडी पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर तिला परीक्षेला बसू देण्यात आले.