नैतिकतेची आणि धनंजय मुंडेंची भेटच झाली नाही, महाराष्ट्राची बदनामी दोन व्यक्तींमुळे झाली; सुप्रिया सुळे यांचा घणाघात

वाल्मीक कराडला आरोपी नंबर एक केलं. यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. ज्या अमानुष पद्धतीने संतोष देशमुख यांचा बीडमध्ये खून झालेला आहे, एकच प्रश्न आहे की या व्यक्तीची हिंमतच कशी होते? त्यांना अमानुष वागण्याचा अधिकार कोणी दिली? त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणीतरी मोठं त्याच्या मागे असल्याशिवाय एवढा अंदाधुंध कारभार चालेल कसा एखाद्या जिल्ह्यामध्ये? दुर्दैवं आहे देशमुख कुटुंबाला इतकी मोठी किंमत मोजावी लागली. 70-75 दिवस होऊन गेले तरी अजून एक आरोपी कृष्ण आंधळे फरार आहे. तो सापडत कसा नाही? एक सातवा खुनी असा 70-75 दिवस हा फरार असू कसा शकतो? हा प्रश्न सरकारला पडत नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

सुरेश धसांच यापूर्वी एक स्टेटमेंट आहे की, नैतिकतेची धनंजय मुंडे यांची कधी भेटच झालेली नाही. आणि जसे दिवस जाताहेत तसं बघता सुरेश धस म्हणाले त्यावर शिक्कामोर्तब होतंय. नैतिकतेची आणि धनंजय मुंडे यांची भेटच नाही झाली. त्यामुळे यांच्याकडून आपण काय आपेक्षा करणार. आणि कुठली केस राहिली बीडमध्ये? खून झाला, खंडणी, शेतकऱ्यांच्या पिकविम्यात फसवणूक, हार्वेस्टरमध्ये फकवणूक, घरगुती हिंसाचार अजून कुठला गुन्हा करायचा राहिला आहे? असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

अवादा कंपनीने तक्रार केली त्यावेळीच या हैवानांना आवरलं नसतं तर हा दिवस आला नसता. आमच्या वैभवीचे वडील तिच्या बरोबर असते. देशमुख कुटुंब, महादेव मुंडेंचं कुटुंब आणि परभणीमध्ये सोनावणे कुटुंबाला मी भेटले आहे. त्या कुटुंबाला न्याय मिळणं ही आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. आणि त्यांनी नैतिक सोडली असेल तरी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मीडियाने नैतिकता सोडलेली नाही. महाराष्ट्राचं जे नाव देश पातळीवर खराब झालेलं, महाराष्ट्राची बदनामी दोन व्यक्तींमुळे झालेली आहे. त्याच्यात बीडचा आणि परळीकरांचा काहीही संबंध नाही. दोन लोकांच्या गलिच्छ कृतीमुळे आज राज्याचं नाव देश पातळीवर खराब झालेलं आहे. गुंतवणुकीसाठी समस्या निर्माण झाली आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड जोडीवर शरसंधान साधलं.