विशेष – जर्मनीचा लोकप्रिय ‘उजवा’ चेहरा!

>> राहुल गोखले

राजकीय क्षेत्रात भारतासह जगभरात अनेक महिलांनी आपले स्थान आपल्या कर्तृत्वाने मिळविले आहे. अॅलिस वायडेल यांचे नाव आता त्याच पंक्तीत जोडले जाईल. त्या केवळ ‘एएफडी’ पक्षाच्याच चेहरा नव्हेत, तर कदाचित युरोपातील उजव्या विचारसरणीच्यादेखील महत्त्वाचा चेहरा ठरू शकतात. महिला दिन काही दिवसांवरच येऊन ठेपला असताना अॅलिस वायडेल यांना जर्मनीच्या मतदारांनी दिलेली ही अनोखी भेट आहे असेच म्हटले पाहिजे.

जर्मनीत नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनी तेथील राजकारणाला मोठी कलाटणी दिली आहे. दुसऱया महायुद्धानंतर आजतागायत तेथे अतिउजव्या पक्षांना राजकीय परिघातून अन्य पक्षांनी बाहेर ठेवले होतेच; पण अतिउजव्या पक्षांना फारसा जनाधारदेखील मिळत नव्हता. यंदा मात्र हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. तेथील ‘एएफडी’ या उजव्या विचारसरणी मानणाऱया पक्षाला तब्बल वीस टक्के मते मिळाली आहेत आणि तो दुसऱया स्थानावरील पक्ष ठरला आहे. त्या पक्षाला सत्तेत जरी स्थान मिळणार नसले तरी जर्मन संसदेत त्या पक्षाची ताकद वाढल्याने आता अन्य पक्षांना आपल्या धोरणांवर पुनर्विचार करणे भाग पडणार आहे. ‘एएफडी’ पक्ष 2013 साली स्थापन झाला तो युरोपातील ग्रीस इत्यादी डबघाईला आलेल्या राष्ट्रांना संपन्न युरोपियन राष्ट्रांनी केलेल्या आर्थिक साह्याचा विरोध करण्याच्या उद्देशाने. तथापि लवकरच त्या पक्षाने स्थलांतरितांविरोधी भूमिका घेत उजवे वळण घेतले. गेल्या निवडणुकीत या पक्षाला मिळालेल्या मतांचे प्रमाण दहा टक्के होते. ते यंदा वीस टक्के झाले आहे. ‘एएफडी’ पक्षाच्या या घवघवीत यशाच्या शिल्पकार आहेत त्या पक्षाच्या नेत्या अॅलिस वायडेल. महिला दिनाच्या उंबरठय़ावर वायडेल यांनी बजावलेली कामगिरी अधिकच लक्षवेधी ठरते.

ज्या पक्षात अतिरेकी उजव्या विचारसरणीचा पुरस्कार करणारे नेते होते; त्या पक्षाची प्रतिमा काहीशी सौम्य तरीही ठाम अशी तयार करण्यात वायडेल यांचा हातभार मोठा आहे. अर्थात त्याही अनेकदा वादग्रस्त विधाने करीत आल्या आहेत. तथापि आता जर्मनीतच नव्हे, तर युरोप-अमेरिकेतदेखील वायडेल यांच्या राजकारणाची आणि राजकीय भूमिकांची दखल घेतली जाणे स्वाभाविक. वायडेल या यंदा चान्सलरपदाच्या उमेदवार होत्या. हेही जर्मनीच्या युद्धोत्तर इतिहासात प्रथमच घडत होते. निवडणुकीत ‘एएफडी’ पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर त्या पक्षाच्या झालेल्या सोहळ्यात समर्थकांनी ‘अॅलिस फॉर डॉईशलँड‘च्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. गेल्या महिन्यात पक्षाच्या अधिवेशनात समर्थकांनी वायडेल यांना भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या. निवडणुकीपूर्वी अमेरिकी उद्योगपती एलान मस्कने वायडेल यांना पाठिंबा दिला होता आणि म्युनिक सुरक्षा परिषदेत सहभागी होण्यासाठी आले असता अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांनी वायडेल यांची भेट घेतली होती. त्या सुरक्षा परिषदेत ‘एएफडी’ पक्षाला प्रवेश बंदी होती आणि वायडेल यांना तेथे येण्यास मज्जाव होता. तेव्हा व्हॅन्स यांनी वायडेल यांची भेट अन्य स्थळी घेतली. आता मात्र जर्मनीत सर्वांचेच डोळे उघडले आहेत. ‘एएफडी’ पक्षाला मिळालेला सर्वाधिक पाठिंबा हा बर्लिन भिंत पाडली जाण्यापूर्वीच्या पूर्व जर्मनी भागात असला आणि पूर्व-पश्चिम जर्मनी आर्थिक-सामाजिक परिस्थितीतील तफावत हे त्याचे कारण असले तरी ‘एएफडी’ पक्षाने पश्चिम भागातदेखील खाते उघडले आहे. तेव्हा त्या पक्षाला मिळणारा जनाधार विस्तारत आहे. 2029 सालच्या निवडणुकीत ‘एएफडी’ पक्षाला सत्तेपासून वंचित ठेवणे कठीण होईल अशी वायडेल यांची धारणा आहे.

वायडेल यांचे आयुष्य बहुपेडी आहे आणि काही विसंगतींनीदेखील भरलेले आहे. 6 फेब्रुवारी 1979 रोजी पश्चिम जर्मनीत जन्मलेल्या वायडेल यांना त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सतावत आली आहे. त्यांचे आई-वडील जरी राजकारणात सक्रिय नसले तरी वायडेल यांचे आजोबा हिटलरच्या नाझी प्रशासनात न्यायाधीश होते. व्यापार आणि अर्थशास्त्र या विषयांत वायडेल यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी काही काळ गोल्डमन सॅक्स या संस्थेत काम केले. तथापि तेथे त्यांचे मन रमले नाही तेव्हा त्या सरळ चीनला गेल्या. चीनमध्ये बोलली जाणारी मँडरिन भाषा त्या शिकल्या. चीनमधील बँकेत त्यांनी काही काळ काम केलेच; पण डॉक्टरेट पदवीसाठी त्यांनी संशोधनदेखील केले. ‘चीनमधील सेवानिवृत्ती वेतन प्रणाली’ या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला आणि त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. काही खासगी वित्तसंस्थांमध्ये वायडेल यांनी सल्लागार म्हणून काम केले. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी कॅनडा, सिंगापूर, चीन, जपान अशा देशांत त्यांनी काम केले.
राजकारणात त्या सक्रिय झाल्या त्याच ‘एएफडी’ पक्षाच्या माध्यमातून आणि मग त्या पक्षात एकेक पायऱया चढू लागल्या. मात्र हेही खरे की, पक्षाची अतिउजवी प्रतिमा बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यात त्यांना फारसे यश आले नाही हा भाग अलहिदा. हिटलरच्या काळातील नारे देणारे त्या पक्षाचे नेते बॉर्न होक यांच्या हकालपट्टीसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. तथापि ते शक्य झाले नाही आणि मग त्यांनी त्यांच्याशी राजकीय समेट केला. जर्मनीतील बेकायदेशीर स्थलांतरितांची घाऊक प्रमाणावर देशाबाहेर रवानगी करावी ही ‘एएफडी’ पक्षाची मागणी. वायडेल यांनी पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमातून त्या भूमिकेस वगळण्याची तयारी केली, पण पक्षातील कट्टरवाद्यांनी वायडेल यांना धारेवर धरले. अखेरीस वायडेल यांना माघार घ्यावी लागली आणि निवडणुकीत पक्षाच्या जाहीरनाम्यात तो मुद्दा कायम ठेवावा लागला. 2017 साली त्या संसदेत निवडून गेल्या तेव्हा राजकीय विरोधकांनी त्यांच्याबरोबर लिफ्टमधूनदेखील जाण्यास नकार दिला होता. त्यांच्याशी चर्चा करणे दूरच राहिले. अशा स्थितीतून वायडेल यांनी ‘एएफडी’ पक्षाला आताच्या लक्षणीय स्थितीत आणले आहे.

ब्रिटनच्या दिवंगत पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांना त्या आपले आदर्श मानतात आणि त्यांनी जसे कठोर निर्णय धडाडीने घेतले तसेच निर्णय जर्मनीत घेतले जावेत असा वायडेल यांचा आग्रह असतो. वायडेल यांच्या काही भूमिका वादग्रस्त ठरल्या आहेत. त्यांनी स्थलांतरितांच्या मुद्दय़ाला दिलेले धार्मिक वळण असो किंवा पवनचक्क्या काढून टाकाव्यात, कार्बन न्यूट्रल अर्थव्यवस्था मोडीत काढावी अशा स्वरूपाच्या त्यांच्या राजकीय भूमिका असो, त्या ट्रम्प यांच्या भूमिकांशी साधर्म्य सांगणाऱया आणि तरीही त्यांची प्रतिमा ‘एएफडी’ पक्षाच्या तुलनेने मवाळ नेत्या अशी आहे हे विशेष. प्रसंगी पक्षाच्या अधिकृत धोरणात्मक भूमिकांशी त्यांनी वैयक्तिक जीवनात फारकत घेतली आहे. आदर्श, पारंपरिक कुटुंब ही त्या पक्षाची भूमिका. वायडेल मात्र समलैंगिक आहेत. मूळच्या श्रीलंकेतील, पण स्वित्झर्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या एका महिलेबरोबर त्या वास्तव्य करतात. त्या दोघींनी दोन मुलांना दत्तकही घेतले आहे. हे पक्षाच्या भूमिकेशी सुसंगत नाही; पण वायडेल आपले वैयक्तिक आयुष्य चर्चेचा विषय बनू देत नाहीत.

‘एएफडी’ पक्षाच्या त्या सर्वाधिक लोकप्रिय नेत्या आहेत हे या निवडणुकांनी अधोरेखित केले आहे. यंदा प्रथमच दूरचित्रवाणीवरील वादचर्चेत (डिबेट) वायडेल यांना स्थान मिळाले होते. हाही जर्मनीच्या राजकारणातील मोठा बदलच. त्यात त्यांनी चान्सलर पदाचे उमेदवार आणि आता विजयी पक्षाचे नेते फ्रेडरिक मर्ज यांची खिल्लीही उडविली होती. जर्मनीत असल्या तरी आंतरराष्ट्रीय राजकारणाची नाडी त्यांना ठाऊक आहे. गेल्या वर्षी बर्लिनमध्ये एलान मस्क यांच्या टेस्ला कारखान्याबाहेर अतिडाव्या संघटनांनी निदर्शने केली आणि वीज पुरवठा कापून टाकला तेव्हा वायडेल यांनी मस्क यांना पाठिंबा जाहीर केला होता. कदाचित आता मस्क वायडेल यांना जाहीर पाठिंबा देत असण्यामागे ते कारण असू शकते. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान वायडेल यांनी बुडापेस्टला भेट देऊन तेथील उजव्या विचारसरणीचे पंतप्रधान व्हिक्टर ओरबान यांची भेट घेतली होती. जर्मनीतील उजव्या विचारधारेच्या मतदारांना चुचकारण्याचा त्यांचा हेतू होता हे लपलेले नाही.

जर्मनीच्या निवडणुकांनी युरोपचे उजवे वळण अधोरेखित केले आहे. नेदरलँड, ऑस्ट्रिया, हंगेरी, फ्रान्स, युरोपीय महासंघ येथे उजव्यांची सरशी होत आहे. तोच कित्ता जर्मनीने गिरविला आहे. प्रश्न सत्ता मिळाली किंवा नाही हा नाही. ‘एएफडी’ पक्षाला राजकीय परिघाबाहेर ठेवण्याच्या कथित ‘फायरवॉल’ संकल्पनेला या निकालांनी तडा दिला आहे. त्याचे श्रेय निसंशय वायडेल यांचे. जर्मनी उजवे वळण का घेत आहे, याचे आत्मपरीक्षण डाव्यांनी आणि मध्यममार्गी पुराणमतवादी पक्षांनी करायचे आहे. तूर्तास मात्र वायडेल यांनी आपल्या पक्षाला प्रबळ स्थानावर पोहोचवले आहे आणि वायडेल यांची उपेक्षा करणे विरोधकांना शक्य होणार नाही. राजकीय क्षेत्रात जगभरात अनेक महिलांनी आपले स्थान कर्तृत्वाने मिळविले आहे. अॅलिस वायडेल यांचे नाव आता त्याच पंक्तीत जोडले जाईल. त्या केवळ ‘एएफडी’ पक्षाच्याचा चेहरा नव्हे, तर कदाचित युरोपातील उजव्या विचारसरणीच्यादेखील महत्त्वाचा चेहरा ठरू शकतात. महिला दिन काही दिवसांवरच येऊन ठेपला असताना अॅलिस वायडेल यांना जर्मनीच्या मतदारांनी दिलेली ही अनोखी भेट आहे असेच म्हटले पाहिजे.

[email protected]