
>> प्रेमसागर मेस्त्री
खवले मांजर हा सस्तन प्राणी अतिशय देखणा, गरीब आणि लाजाळू वन्य जीव, जो संरक्षण अधिनियम कायद्यानुसार ‘वर्ग अनुसूची 1’मध्ये समाविष्ट आहे. यानुसार वन्य जीवांची तस्करी रोखण्यासाठी शासनाकडून कठोर कारवाई आणि कडक नियमांची अंमलबजावणी अपेक्षित आहे. तरीदेखील त्यांची प्रचंड तस्करी होताना दिसते. जगातील सर्वाधिक तस्करी होणाऱया वन्य जीव प्राण्यांमध्ये खवले मांजराची नोंद होते. वन्य जीव संरक्षण अधिनियमांतर्गत ही प्रजाती ‘अनुसूची1’मध्ये समाविष्ट असूनदेखील या प्राण्याच्या तस्करीचा आलेख उंचावत आहे ही चिंतेची व धोक्याची घंटा आहे.
खवले मांजर अहवाल ट्रेड रेकॉर्डस् अॅनालिसिस ऑफ फ्लोरा अँड फाऊना इन कॉमर्स (Trade Records Analysis of Flora and Fauna in Commerce (TRAFFIC) आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया यांनी खवले मांजरांच्या होणाऱया शिकारीबद्दलची माहिती प्रकाशित केली आहे. देशात महाराष्ट्राचा जप्तीबद्दल कारवाई करण्यात दुसरा क्रमांक लागतो. भारतातील खवले मांजर तस्करीत वर्षाकाठी 342 जप्तीच्या घटनांमध्ये अवैध वन्य जीव व्यापारासाठी 1203 खवले मांजरांची शिकार आणि तस्करी झाल्याची नोंद आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यांतील तस्करीत वन विभाग कार्यवाही नोंदीनुसार थेट मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा असे जाळे पसरले आहे. रायगड जिह्यातील अनेक तस्करीत पोते भरलेले खवले, नखे तसेच जिवंत प्राणी हस्तगत करण्यात आले आहेत.
या सर्व अवशेष आणि जिवंत वन्य जीव प्राण्यांचे नियोजनपूर्वक तस्करी मार्ग उत्तर प्रदेश गोरखपूर, अलाहाबाद आणि दिल्लीत स्थिरावतात. पुढे ओडिशात त्यावर दलालांमार्फत दर ठरवून बंगाल, सिक्कीम राज्यांतील छुप्या मार्गे म्यानमार, व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया आदी देशांकडून चीनमध्ये पश्चिम-मध्य भागांतून अनेक प्रकार बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जातात. या सर्व प्रवासात स्थानिक आदिवासी बांधवांकडून खूप कमी पैशांनी हे खवले मांजर विकत घेतले जाते. पुढे मुंबई आणि त्यानंतर परराज्यात पाठविताना त्यांची किंमत काही लाखांत पोहोचते, तर इतर प्रदेशांमध्ये पुन्हा याचे भाव चौपट होतात. आता प्रसार माध्यमांतूनदेखील अशा पद्धतीचे नेटवर्क पोलीस यंत्रणा आणि गुप्त गुन्हे अन्वेषण विभागाने प्रकाशात आणले. या तस्करीत सर्वाधिक घटना ओडिशात घडताना दिसतात. इथेच कारवाईमधील घटनेत 154 खवले मांजर आढळले, तर त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 135 खवले मांजर तस्करीत आढळले आहेत. जवळपास 128 कमी अधिक जिवंत खवल्या मांजरांचा समावेश आहे.
अतिशय क्रूर म्हणजे उकळत्या पाण्यात टाकून त्याला मारतात. चिनी औषधांत पारंपरिक औषध निर्मिती आणि मांस यासाठी खवले मांजराच्या खवल्यांचा उपयोग प्रामुख्याने चायनीज आणि व्हिएतनाममध्ये औषधे तयार करण्यासाठी केला जातो ही आजच्या काळात खूप गंभीर बाब आहे. खवले मांजर ही सस्तन प्राणी प्रजात आहेत. आशिया आणि आफ्रिका खंडात त्यांचे अस्तित्व आहे. स्केली बॉडी असणारा हा प्राणी अँट ईटर म्हणूनही ओळखला जातो.
त्याचे खवले हे डेड केराटिन नामक प्रोटिनने बनलेले असते. मानवी केस आणि नखांमध्ये हेच प्रोटिन असते. त्यामुळे त्यात काही औषधी गुणधर्म असतात हे मानणे पूर्ण चुकीचेच आहे. अशा एक ना अनेक कारणांनी त्याची तस्करी केली जाते.
त्याला दात नाहीत. चिकट जिभेने तो अन्न शोषतो. कीटक, मुंग्या, वाळवी आणि अळ्या यांवर तो अवलंबून असतो. त्याची नखे चांगलीच टोकदार असतात. त्याच्या साहाय्याने तो जमीन उकरतो. बिळात घर करून राहतो, तर मुंग्यांचे वारूळ तो सहज फोडतो. तो निशाचर आहे.
संकटग्रस्त खवले मांजराच्या सर्व आठ प्रजाती IUCN रेड लिस्टमध्ये संकटग्रस्त प्रजाती म्हणून नोंदवण्यात आल्या आहेत. त्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार CITES अंतर्गत निषिद्ध आहे. कोकणात तसेच सर्वच ठिकाणी फार मोठय़ा प्रमाणावर त्याची (हॅबिटॅट) प्राकृतिक अधिवास नष्ट होत आहे. अतिशय संवेदनशील अधिवास दिवसेंदिवस नष्ट होत असून त्यावर योग्य असे ठोस तत्काळ उपाय होताना दिसत नाहीत. नवीन विकास प्रकल्प आणि शेती बागायत तंत्रज्ञान विकसित होत चालले आहे. त्यात जमिनीवर उत्खनन करणारी महाकाय जेसीबी पोकलेन मशीन, सुरुंग आदी अनेक घातक परिणाम करणारे प्रकल्प कार्यान्वित आहेत.
जंगलतोड उत्खननावर कोणतेच निकष ठरविण्यात आले नाहीत. ठरविल्यास त्याची अंमलबजावणी नक्की केली जाते का? त्यामुळे छोटय़ाच आकाराच्या मर्यादित अधिवास परिस्थितीवर या प्राण्याला अवलंबून राहून स्वतचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करावा लागत आहे.
[email protected]
(लेखक रायगड जिल्हा, मानद वन्यजीव रक्षक आहेत.)