
>> मेघना साने
कधी सीमेवरची छुपी युद्धे तर कधी जखमी सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी घेतलेले कष्ट असे दुहेरी युद्ध लढत एका रोमांचकारी करिअरचा अनुभव घेणारी आर्मी डॉक्टर आश्लेषा तावडे-केळकर. ‘आर्मी डॉक्टर असणे हे नुसतेच करिअर नाही, तर ती देशसेवाही आहे.’ हे सांगताना तिची कामाप्रतीची श्रद्धा, निष्ठा या भावना तिच्या देशसेवेच्या संज्ञेला सार्थ करणाऱया आहेत.
मेजर डॉ. आश्लेषा तावडे-केळकर यांची वाट पाहत मी ठाण्यातील गडकरी रंगायतनजवळ उभी होते. मेजर मॅडमचे स्वागत कसे करावे हे मला कळत नव्हते. आश्लेषा डॉक्टर तर आहेच, पण आर्मीमध्ये डॉक्टर असल्याने सैनिकी प्रशिक्षणही तिने घेतले आहे. सीमेजवळील दुर्गम भागात तिने डय़ुटी केली आहे. भारतातून एम.बी.बी.एस. झाल्यावर अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून तिने मेडिसिनचा कोर्स केला आहे. भारतीय सेना दलात 2009 साली तिची कॅप्टन म्हणून निवड झाली. अशा स्त्राrचे स्वागत मी कसे करावे? हस्तांदोलन करावे की सॅल्यूट करावा अशा द्विधा मनस्थितीत असताना एक गाडी समोर थांबली. त्यातून पंजाबी ड्रेस घातलेली एक नाजूकशी मुलगी उतरली. माझ्याकडेच पाहून हसत होती. दोन्ही गालाला खळय़ा! हीच असेल का मेजर?
हीच डॉ. आश्लेषा आहे यावर माझा विश्वासच बसेना. मला कल्पना होती की, तिचे पोस्टिंग सध्या नाशिक येथे आहे आणि तेथून ती थेट ठाण्याला आपल्या स्वतच्या घरी निघाली होती. तिच्या नम्रपणाने मीच दबून गेले.
खरं तर मला खूप प्रश्न पडले होते तिच्या करीअरबद्दल, एक स्त्राr असून आर्मी डॉक्टर असण्याबद्दल! नाना प्रश्न पुढे ठेवून मी संवादाला सुरुवात केली.
‘आर्मी डॉक्टर असणे हे नुसतेच करीअर नाही, ती देशसेवाही आहे. मी त्याकडे सेवा म्हणून पाहत होते. आपल्या जवानांची काळजी घेण्यासाठी मला सीमेवर जायचे होते.’ आश्लेषा गंभीरपणे सांगत होती. तिने जेव्हा ही पोस्ट घेण्याची इच्छा दर्शविली तेव्हा तिचा विवाह ठरला होता. साहजिकच तिचा आणि तिच्या पतीचा काही महिने विरह होणार होता. पण त्यानेही उदार मनाने परवानगी दिली. सासू-सासऱयांनीही पाठिंबा दिला. आईवडील तर एकुलत्या एक मुलीची इच्छा पूर्ण करणार होतेच. आपली मुलगी किती धैर्यवान आहे आणि तिला रोमांचकारी आयुष्य जगायला आवडते हे त्यांना माहीत होते. आश्लेषा सीमेवर जाण्यास निघाली तेव्हा काहींनी आडबाजूने काळजी व्यक्त केली. मात्र वडिलांनी आपल्या देशप्रेमी मुलीचा अभिमान बाळगून तिची इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले. डॉ. आश्लेषा ही पार्ले टिळकची आणि साठय़े कॉलेजची विद्यार्थिनी आहे.
सैन्यदलात गेल्यावर डॉ. आश्लेषा यांची कारकीर्द नेत्रदीपक अशी दिसून येते. 26 फेब्रुवारी 2009 रोजी कमांड हॉस्पिटल, पुणे येथे कॅप्टन पदावर कमिशन प्राप्त झाले. त्यानंतर दोन महिने लखनऊ आर्मी ट्रेनिंग स्कूलमध्ये त्यांनी खडतर प्रशिक्षण घेतले. 3 सप्टेंबर 2009 रोजी नौशेरा या अतिदुर्गम व अतिसंवेदनशील अशा पाक सीमेवर तीन वर्षे तीन महिने त्यांची नियुक्ती झाली. तेथे त्यांनी काम पूर्ण केले. ऑक्टोबर 2012 मध्ये ‘आयएनएस हमला’ या नाविक तळावर आर्मी डॉक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 26 फेब्रुवारी 2013 रोजी त्यांची मेजर पदावर बढती झाली. राजौरी, पूंछ, सुरणकोटा, नौशेरा अशा अतिदुर्गम भागात रात्रंदिन युद्धाचा प्रसंग त्यांनी अनुभवला आहे. साडेतीन वर्षांत कधी सीमेवरची छुपी युद्धे तर कधी जखमी सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी घेतलेले कष्ट असे दुहेरी युद्ध त्यांना अनेक वेळा लढावे लागले. ‘माझा डॉक्टर मला वाचवण्यासाठी सक्षम आहे.‘ हा विश्वास सैनिकांमध्ये निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.
‘स्त्राr म्हणून तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं?’ या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना आश्लेषा गंभीर झाल्या. ‘मी स्त्राr असूनही एक आर्मी डॉक्टर म्हणून सक्षम आहे हे सिद्ध करण्यासाठी एखाद्या पुरुष ऑफिसरपेक्षा मला निश्चितच जास्त मेहनत करावी लागते. माझ्या बटालियनमधील सर्व सैनिकांची तब्येत उत्तम असली पाहिजे यासाठी मला जागृत राहावं लागत होतं. ते काम तर मी करतच होते, पण एखाद्या वेळी एखाद्या तरुण सैनिकाला एकटेपणामुळे, घरापासून दूर राहिल्याने वैफल्य आलं तर त्याला ताईसारखा किंवा आईसारखा आधार द्यावा लागत होता. त्यावेळी मी मनाची डॉक्टरही होते. स्त्राrजवळ असणारे अंगभुत वात्सल्य त्यावेळी कामी येते. कधी कधी माझ्यापेक्षा मोठे असणारे अधिकारी घरची एखादी समस्या कळल्यामुळे माझ्याजवळ रडू लागतात. तेव्हा मला मृदू होऊन त्यांची आई व्हावं लागतं. स्त्राrजवळ असलेलं वात्सल्य ही फार मोठी गोष्ट असते.’ म्हणून आर्मी डॉक्टर ही महिला असावी लागते.
सीमेवर असताना डॉ. आश्लेषा कायम सैनिकी वेशात नसतात. जेव्हा सैनिकांची कुटुंबे सैनिकांना भेटायला येतात, मग ती आई असो बायको असो किंवा सीमेवर असलेल्या हॉस्पिटलमध्ये जखमी सैनिकांना उपचार करायला डॉ. आश्लेषा जातात तेव्हा त्यांचा पोशाख असतो ऑलिव्ह ग्रीन साडी. त्यामुळे येणाऱया कुटुंबांनाही बोलायला आपलेपणा वाटतो. आर्मी डॉक्टर स्त्राr असल्याचा हाच फार मोठा फायदा आहे.
आर्मी डॉक्टरला फक्त सैनिकांचीच नाही, तर आजूबाजूच्या भागातील लोकांचीही काळजी घ्यावी लागते. एकदा चार इसमांनी दोन डोंगर पार करून खाटेवरून एका गरोदर स्त्राrला उचलून आणलं आणि डॉ. आश्लेषा यांच्यासमोर ठेवले. त्या स्त्राrला रक्तस्त्राव होत होता. त्यांनी तिला कधीही आजूबाजूच्या डॉक्टरला दाखवले नव्हते; कारण स्त्राrचे शरीर पुरुष डॉक्टरला दिसता कामा नये अशी त्यांची धारणा होती. डॉ. आश्लेषा यांनी तिला तपासल्यानंतर ट्रीटमेंट दिली. भरपूर इन्फेक्शन झाले होते, पण वैद्यकीय उपचारानंतर ती वाचली.
स्वास्थ्य हा आपला मूलभूत हक्क आहे. ई-संजीवनी हा आपल्या देशांच्या जवानांसाठी वैद्यकीय सल्ला देण्याचा आणि औषधोपचार ई-मेल करण्याचा उपक्रम आहे. त्यासाठी डॉ. आश्लेषा यांनी काम केले. तसेच डिजिटल हेल्थ तंत्रज्ञानामार्फत आपण औषधोपचार सर्वांपर्यंत पोहोचवू शकतो हा त्यांचा विश्वास आहे. शिवाय, या उपचार पद्धतीत केवळ अॅलोपॅथीचा समावेश नसून, आयुर्वेद आणि त्यासारख्या इतर प्राचीन ज्ञानाचाही समावेश केलेला आहे, जेणेकरून रुग्ण हा बरा होण्यास मदत होते. याशिवाय आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा ते होऊच नयेत म्हणूनही हेल्थ एज्युकेशन थ्रू डिजिटल टेक्नॉलॉजी हा उपक्रम त्या राबवतात.