
भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या जलवाहिनीचे काम संथ गतीने सुरू आहे. हे काम करीत असताना जलवाहिनी टाकण्याच्या कामाला अडथळा ठरणारे इंदोरी ते वाकीतर्फे वाडा या मार्गावरील 300 उच्च दाब वीजखांब हलविण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने तीन कोटी चार लाख 63 हजार 448 रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे एकीकडे हे काम संथ गतीने सुरू असतानाच या प्रकल्पाच्या खर्चात विविध कारणांमुळे वाढ होत असल्याचे चित्र आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा आसखेड घरणात 167 एमएलडी पाण्याचा कोटा राखीव करण्यात आला आहे. धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने 2020 मध्ये निविदा प्रक्रिया राबवून जलवाहिनी टाकण्याचे काम ‘ऑफशोअर इंडिया लि.’ या ठेकेदाराला दिले. या कामाची चार वर्षांची मुदत संपली, तरी हे काम अपूर्णच आहे. या जलवाहिनीचे काम 50 टक्केच पूर्ण झाले आहे. नवलाख उंबरेपासून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. जलवाहिनीचे संपूर्ण काम 162 कोटी रुपयांचे आहे. काम सुरू करण्याचा आदेश 15 डिसेंबर 2020 रोजी दिला होता. कामाची मुदत 15 डिसेंबर 2024 अशी चार वर्षांची होती. मात्र, या मुदतीत 19 किलोमीटरपैकी केवळ नऊ किलोमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे.
दरम्यान, आंद्रा धरणातील पाणी नवलाख उंबरे येथून एकाच जलवाहिनीतून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यात येणार आहे. या मार्गात साडेसात किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. मात्र, या कामाला अद्यापि सुरुवात झालेली नाही.
जलवाहिनीचा ठेकेदार व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची कामाच्या गेल्या महिन्यात आढावा बैठक घेतली. यामध्ये झालेल्या कामाचा आढावा घेतला. भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या जलवाहिनीचे काम संथ गतीने सुरू आहे. या कामाची चार वर्षांची मुदत संपली, तरी काम अपूर्णच आहे. या जलवाहिनीचे काम 50 पूर्ण टक्के झाले आहे. उर्वरित काम करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
खांब हटविण्यासाठी वर्षभराची मुदत
इंदोरी ते वाकीतर्फे वाडा या मार्गावर जलवाहिनी टाकण्यास अडथळा ठरणारे 300 वीजखांब हलविण्यासाठी ‘महावितरण’च्या परवानगीनंतर शुल्क भरून हे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी तीन कोटी चार लाख 63 हजार 448 रुपयांची निविदा महापालिकेच्या विद्युत विभागाने प्रसिद्ध केली आहे.