Pune Bus Rape Case – गुन्हे शाखा-स्वारगेट पोलिसांचा श्रेयासाठी आटापिटा

स्वारगेटमधील अत्याचार प्रकरणातील नराधमाला गुनाट गावातील प्राध्यापक तरुणाने झडप मारून पकडले होते. मात्र, गुन्हे शाखा आणि स्वारगेट पोलिसांच्या श्रेयवादाच्या लढाईची जोरदार चर्चा सुरू आहे. जंगजंग पछाडूनही आरोपी मिळत नसल्याने गुन्हे शाखेच्या पथकांनी स्वारगेट पोलिसांकडून आरोपीला ताब्यात घेण्यासाठी चक्क नगर रस्त्यात गाड्या आडव्या उभ्या करीत रस्ता अडविला. मात्र, स्वारगेट ठाण्यातील चतुर त्रिकुटाने आपणच आरोपीला पकडल्याच्या आविर्भावात त्याला घेऊन थेऊरमार्गे पोलीस ठाणे गाठत गुन्हे शाखेला चकवा दिला.

आरोपी दत्तात्रय गाडे उसाच्या रानातून बाहेर आल्यानंतर गावातील प्राध्यापक गणेश गव्हाणे यांनी झडप घालून त्याला पकडले. स्वारगेट पोलीस ठाण्यातील त्रिकुटाने चमकोगिरीसाठी आणि वरिष्ठांना आपली कामगिरी दाखविण्यासाठी आरोपीला हिसकावून ताब्यात घेतल्याचा दावा प्राध्यापकाने केला आहे. त्यानंतर गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून आरोपी आपल्यालाच मिळाला पाहिजे, यासाठी रस्सीखेच डाव रचला. नगर रस्ता परिसरात वाहने आडवी उभी करून गुन्हे शाखेने रस्ता अडविला. मात्र, त्यांचा प्रयत्न स्वारगेट पोलिसांनी हाणून पाडला.

डागळलेली छबी उजळविण्यासाठी काथ्याकूट

पर्यटनावरून थेट गुनाटला पोहोचून नामांकित त्रिकुटाने थेऊरमार्गे आरोपीला स्वारगेटला मोटारीतून ठाण्यात नेत गुन्हे शाखेला धोबीपछाड केला. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इलेक्ट्रॉनिक माध्यमांसह पत्रकारांमध्ये आपली डागाळलेली छबी पुन्हा उजळविण्यासाठी संबंधित त्रिकुटाने केलेले बेरकी प्लॅनिंग व्हिडीओतून दिसून आले आहे. दरम्यान, उसाच्या शेतीतील चिखल, बिबट्याच्या धास्तीने संबंधित अंमलदारांनी वरवर आरोपी शोधल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. जिगरबाज तरुणाने आरोपीला पकडून ठेवले होते. त्याचे कौतुक करण्याऐवजी त्रिकुटाने केलेली चमकोगिरी दिसून आली आहे.