नियम धाब्यावर बसवून पोखरला जातोय डोंगर, धुळीच्या लोटाने घुसमट; ठाणे-बोरिवली बोगद्याचे काम मानपाडावासीयांनी बंद पाडले

ठाणे-बोरिवली बोगद्याच्या कामातील अनागोंदी कारभाराविरोधात संतप्त मानपाडावासीय रस्त्यावर उतरले. नियम धाब्यावर बसवून अजस्त्र पोकलेन, जेसीबीने डोंगर पोखरले जात असून धुळीचे लोटच्या लोच या भागात पसरत आहेत. त्यातच माती भरलेले शेकडो डंपर बेदरकारपणे या भागातून ये-जा करीत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह रहिवाशांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. एमएमआरडीए अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच कंत्राटदाराची ही मनमानी सुरू असल्याने या भागातील शेकडो नागरिकांनी आंदोलन करत बोगद्याचे काम बंद पाडले.

ठाणे-बोरिवली अंतर कमी करतानाच घोडबंदरवरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून दोन मोठे भुयारी मार्ग बांधण्यात येत आहेत. एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या या प्रकल्पाला जवळपास १६ हजार कोटी रुपये खर्च येणार असून या बोगद्यांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. मात्र कंत्राटदार मनमर्जीने काम करीत असल्याने मानपाडा परिसरातील हजारो रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे

बोगदा खणताना निघत असलेल्या लाखो ब्रास मातीमुळे धुळीचे लोट या परिसरात चोवीस तास उठत आहेत. या धूळ प्रदूषणाबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने घराघरांमध्ये अक्षरशः मातीचे थर जमा होत आहेत. नागरिकांना घशाचा, दम्याचा त्रास होऊ लागला आहे. त्यातच बेदरकारपणे कंत्राटदाराचे डंपर चालत असल्याने अपघाताची शक्यता आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेकडो रहिवाशांनी रस्त्यावर उतरत काम बंद पाडत कंत्राटदाराला पिटाळून लावले.

आधी उपाययोजना करा… मगच पाऊल ठेवा

रहिवाशांनी कंत्राटदाराच्या कामगारांना पिटाळून लावत त्यांच्या व्यवस्थापकाला घेराव घातला. आधी उपाययोजना करा मगच काम करण्यासाठी पाऊल ठेवा असा इशारा दिला. दरम्यान या आंदोलनानंतर कंत्राटदाराने एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊनही आज निळकंठ ग्रीन या इमारतीत आयोजित केलेल्या बैठकीला एकही अधिकारी न फिरकल्याने रहिवासी अधिकच भडकले आहेत. उपाययोजना न केल्यास बोगद्याचे काम करू देणार नाही, असा इशाराच येथील रहिवाशांनी आजच्या बैठकीत कंत्राटदाराला दिला. यावेळी दीपक मल्होत्रा, प्रल्हाद गोडसे, अरविंद टोनी, गौतम दिघे यांसह अन्य रहिवाशी उपस्थित होते.