पोलिसांनी अपहरणाचा डाव उधळला, चाकूसह सहा जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील मुलाला चाकूचा धाक दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा डाव पोलिसांनी हाणून पाडला. या टोळीतील सहा जणांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून चाकू जप्त केला.

सरफराज शहा रऊफ शहा (26, रा. करंजखेडा, ता. कन्नड) यांचे एक वर्षापूर्वी घरासमोरील महिलेसोबत इन्स्ट्राग्रामवर बोलत असल्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला. मात्र हे प्रकरण आपसात मिटविले होते. मात्र या प्रकरणातील महिलेच्या नातेवाईकांनी त्या रागातून शुक्रवारी दुपारी सरफराज रऊफ शहा व त्याचा भाऊ आवेश दुचाकीने नमाजासाठी मशिदीत जात असताना, सहा जणांनी इरटिगा गाडीने रस्ता अडवून, सरफराज शहा याला चाकूचा धाक दाखवून हमारे लडकी को क्यो छलता है क्या असे म्हणून चापटबुक्याने मारहाण करून, जबरदास्तीने कारमध्ये टाकून अपहरण केले. पिशोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांना ही माहिती मिळताच चौकीचे बीट अमलदार पो.हे. पंढरीनाथ इंगळे यांनी दिली. पोलीस ठाण्यातील रायटर विलास सोनवणे, जमादार वसंत पाटील, गणेश कवाळ, चालक गजानन कऱ्हाळे व करण म्हस्के यांना दुपारी एक वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या इरटिगा कारमधील लोकांनी करंजखेडा येथून एका तरुणाला चाकूचा धाक दाखवून किडनॅप केले आहे व ती कार साखरवेल फाटयाकडे येत असल्याची माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी तत्काळ साखरवेल फाट्यावर नाकाबंदी करून, इरटिगा गाडीला थांबवून सरफराजची सुटका केली व या सहा लोकांना व इरटिगा (क्रमांक एमएच 43 ए.एन. 3922) ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

फिर्यादी सरफराज शहा रऊफ शहा याच्या तक्रारीवरून सय्यद मोहम्मद सय्यद, शोएब अली मंजूर अली, मोसीन खाजा शेख, सुलतान गुलाब तांबोळी, सय्यद युसुफ मोहम्मद, सय्यद जुनेद अली मन्सुरअली (सर्व रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्याकडून एक चाकू ही जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास बीट जमादार पंढरीनाथ इंगळे करीत आहेत