
महापालिकेने सांस्कृतिक धोरण तयार केले असून ते मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवले आहे. मात्र, हे धोरण तयार करण्यापूर्वी व त्यासंबंधीचा प्रस्ताव मांडण्यापूर्वी चर्चा केली नसल्याने महापालिका आयुक्तांनी उपायुक्तांना झापल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये होती. तसेच, महापालिकेने हे धोरण बनवताना सल्लागारतज्ज्ञ म्हणून अभिनेता राहुल सोलापूरकरला समितीत स्थान दिले आहे. महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा अभिनेता या धोरणाच्या समितीत असल्याने पालिकेचे सांस्कृतिक धोरण वादात अडकण्याची शक्यता आहे.
पुण्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा आहे. विद्येचे माहेरघर असलेले पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. पुण्याचा सांस्कृतिक वारसा जतन करणे, त्याचे संवर्धन करणे आणि तो टिकविणे, यासाठी महापालिकेने सांस्कृतिक धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सांस्कृतिक उपक्रमांत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी टाऊन हॉल बैठका, सांस्कृतिक मंचाचे आयोजन केले जाणार आहे.
याचबरोबरच पुण्यातील स्थानिक कलाकार, सांस्कृतिक केंद्रे, शैक्षणिक संस्था यांचे सहकार्य घेणे, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे सांस्कृतिक स्थळे, प्रदर्शन स्थळे, कलाप्रदर्शन आणि मैफिलींसाठी जागा निर्माण करून व्यासपीठ उपलब्ध करून देणे. तसेच पर्यटकांना आकर्षित करून स्थानिक व्यावसायिकांचा आर्थिक विकास घडविणे आदी गोष्टींचा यात समावेश असेल.
धोरण करताना शहरातील सांस्कृतिक विविधता, सामाजिक ऐक्य, आर्थिक विकास याचा विचार करण्यात आला आहे. हे धोरण तयार करून ते मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आले आहे.
आयुक्तांनी उपायुक्तांना झापले
सांस्कृतिक धोरण स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी सादर करण्यात आले. धोरण सादर करण्यापूर्वी उपायुक्तांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी या विषयावर चर्चा केली नव्हती. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्तांना झापल्याची चर्चा होती. त्यामुळे सांस्कृतिक धोरणदेखील मंजूर झाले नाही. प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला आहे.