केरळचे दैव रुसले, पहिल्या डावात आघाडीची संधी 38 धावांनी हुकली; विदर्भाची तिसऱ्या रणजी जेतेपदाच्या दिशेने पावले

गेल्या महत्त्वाच्या चारपैकी तीन सामन्यांत दैवाची साथ लाभल्यामुळे हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्या छोटय़ाशा आघाडीच्या जोरावर देवभूमी केरळने रणजी करंडकात बाद फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी असे टप्पे गाठत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. विदर्भविरुद्धच्या अंतिम सामन्यातही केरळचे दैव बलवत्तर असल्यासारखे वाटत होते. कर्णधार सचिन बेबीचा झुंजार खेळ केरळला आघाडी मिळवून देणार, असे चित्रही उभे राहिले. 6 बाद 324 अशा स्थितीत असलेला केरळ आपल्या स्वप्नवत जेतेपदापासून अवघ्या 55 धावा दूर होता. तेव्हाच केरळचे दैव रुसले. विदर्भच्या पार्थ रेखाडेने सचिन बेबीची खेळी 98 धावांवर संपवली आणि त्यानंतर आणखी 2 विकेट टिपत आघाडीच्या दिशेने पावले टाकत असलेल्या केरळचा डाव 342 धावांत संपवण्याचा करिश्मा केला. 6 बाद 324 वरून केरळची सर्वबाद 342 अशी घसरगुंडी उडवत विदर्भने आपल्या तिसऱया रणजी जेतेपदाच्या दिशेने धाव घेतली आहे.

रेखाडेने डाव फिरवला

केवळ सवा तासाचा खेळ शिल्लक होता. बेबी शतकासमीप आणि केरळ आघाडीच्या समीप पोहोचत होता. तेव्हाच पार्थ रेखाडेने बेबीचे शतकी सामन्यात शतकाचे स्वप्न उद्ध्वस्त केले आणि मग केरळच्या आघाडी घेण्याच्या स्वप्नांनाही सुरुंग लावला. बेबी बाद झाला तेव्हा केरळच्या 324 धावा झाल्या होत्या. तेव्हा जलज सक्सेना आणि इडन अॅपल टॉम यांनी तासभर किल्ला लढवत आघाडीची आशा कायम ठेवली. पण रेखाडेने जलजला त्रिफळाचीत केले. पुढे हर्ष दुबेने एमडी निधीशला पायचीत केले आणि मग रेखाडेने टॉमची यष्टी वाकवत केरळलाही आघाडी घेण्याआधीच तंबूचा मार्ग दाखवला. विदर्भच्या दर्शन नळकांडे, पार्थ रेखाडे आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट टिपल्या. विदर्भने आपल्या घरच्या मैदानावर पहिल्या डावात 37 धावांची आघाडी घेत जेतेपदाची अर्धी लढाई जिंकली आहे. आता सामना कितीही चुरशीचा झाला आणि अनिर्णितावस्थेत संपला तर विदर्भच विजेता ठरणार. आता केरळला केवळ निर्णायक विजयच पहिले विजेतेपद जिंकून देऊ शकतो. केरळचे दैव किती बलवत्तर आहे ते पुढील दोन दिवसांत दिसेल. आतापर्यंत आघाडी घेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या केरळला आता आघाडी नव्हे तर विजय रणजी चॅम्पियन बनवू शकतो.

हर्ष दुबेचा पराक्रम

हर्ष दुबेने निधीशला पायचीत करत यंदाच्या रणजी मोसमातील 69 वी विकेट टिपत नवा पराक्रम केला. एका रणजी मोसमात सर्वाधिक 68 विकेट 2018-19 च्या मोसमात बिहारच्या आशुतोष गमनने टिपल्या होत्या. आज तो विक्रम मोडीत काढला. यंदाचा मोसम संपायला अजून दोन दिवस बाकी असून हर्षला दुसऱ्या डावातही गोलंदाजी करून आपल्या विकेटचा आकडा सत्तरीच्या पुढे नेण्याची संधी मिळू शकते. रणजीच्या नऊ दशकांच्या इतिहासात आतापर्यंत एकाही गोलंदाजाला विकेटचा आकडा सत्तरच्या पुढे नेता आलेला नाही.

सचिन बेबीचा झुंजार खेळ

पहिले दोन दिवस विदर्भने वर्चस्व गाजवले होते. गुरुवारी केरळ 3 बाद 131 अशा अवस्थेत होता आणि पहिल्या डावात आघाडी घेण्याचे केरळ आणि विदर्भचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना आज दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ केला. पहिली दोन सत्रे केरळच्या सचिन बेबी आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी गाजवली. बेबीच्या ‘बाहुबली’ खेळाने केरळला पहिल्या डावात आघाडीची स्वप्ने दाखवली. त्याने आदित्य सरवटेसह 63 धावांची भागी रचली. मग सलमान निझारच्या साथीने 49 धावांची भर घातली आणि मोहम्मद अझरुद्दीनबरोबर सहाव्या विकेटसाठी 59 धावांची भागी रचत त्यांना केरळला त्रिशतकासमीप नेले होते. या तीन महत्त्वांच्या भागीमुळे पहिल्या अडीच सत्रात केरळने 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 190 केल्या होत्या. त्यांना आघाडीसाठी 55 धावांची गरज होती आणि 4 फलंदाज शिल्लक होते. बेबी आपल्या शंभराव्या प्रथम श्रेणी सामन्यात 15 व्या प्रथम श्रेणी शतकासमीप पोहोचला होता. तेव्हा विदर्भची धाकधूक चांगलीच वाढली होती. जे गेल्या तीन सामन्यांत घडले होते ते पुन्हा अंतिम सामन्यातही घडणार अशीच स्थिती मैदानावर होती.