
>>दुर्गेश आखाडे
कीर्र… अमावास्येची रात्र आणि त्या रात्री वावरणाऱ्या काळोखाच्या सावल्या असं भीतिदायक वातावरण अमावास्येच्या दिवशी निर्माण केले जाते. काही ठिकाणी अमावास्येच्या दिवशी दंतकथाही सांगितली. आज अमावास्या आहे, रात्री बाहेर पडू नका, असा सल्ला घरातील ज्येष्ठ मंडळी घरातील तरुणांना देतात. पोलिसांना मात्र अमावास्येच्या रात्री गस्त घालावी लागते. अमावास्येच्या रात्री पोलिसांनी गस्त घालण्याची परंपरा ब्रिटिश काळापासून आहे. ही अमावास्येच्या रात्री गस्त घालण्याची परंपरा रत्नागिरीच्या पोलिसांनी आजही जपली आहे. अमावास्येच्या रात्री अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर चोऱ्या करायला बाहेर पडतात. अशा वेळी गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाच्या तावडीत सापडतात.
इतर दिवशी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त घालत असतात. अमावास्येच्या दिवशी पोलिसांची गस्त विशेष असते. अंमलदारांसोबत या गस्तीमध्ये उपविभागीय स्तरावरचे पोलीस अधिकारी सहभाग घेतात. अमावास्येच्या रात्री गस्त घालताना पोलीस ऑल आऊट ऑपरेशनही राबवतात. हॉटेल, लॉजिंगमध्ये पोलीस झाडाझडती घेतात. निर्जन स्थळांवरही पोलिसांची करडी नजर असते.
अमावास्येच्या रात्रीची गस्त ब्रिटिश काळापासून सुरू आहे. ब्रिटिश देश सोडून गेले तरीही अमावास्येच्या रात्री गस्त पोलिसांनी सुरू ठेवली आहे. त्या दिवशी आम्ही ऑल आऊट ऑपरेशन राबवतो. गस्तीच्या वेळी काही गुन्हेगार जाळ्य़ात सापडतात. – नीलेश माईनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी
ब्रिटिशांनी सुरक्षेच्या दृष्टीने सुरू केली गस्त
अमावास्येला गस्त घालण्याची परंपरा ब्रिटिशांच्या काळात सुरू झाली.त्या काळात रस्त्यावर पथदीप नव्हते. सगळीकडे अंधार असायचा. या अंधाराचा फायदा घेत गुन्हेगार मंडळी गुन्हे करत असत. गुन्हेगारांना रोखण्यासाठी ब्रिटिशांनी अमावास्येच्या रात्रीची गस्त सुरू केली. त्या काळात अंधाराचा फायदा घेत चोऱ्या किंवा इतर गुन्हे करण्यासाठी आलेले गुन्हेगार आयतेच पोलिसांच्या तावडीत सापडत असत. ब्रिटिश देश सोडून 75 वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला तरी ब्रिटिशांची ही परंपरा रत्नागिरी पोलिसांनी जपली आहे. आता रस्त्यावर पथदीप सुरू झालेले आहेत. अनेक ठिकाणी सीसीटीव्हीही बसवले आहेत. अशा आधुनिक यंत्रणा असतानाही पोलीस अमावास्येच्या दिवशी मध्यरात्री गस्त घालतात. पोलिसांची पथके तयार करून गस्त घातली जाते. पोलिसांचे पथक हॉटेलवर जाऊन झाडाझडती घेते. लॉजवरील कोणती व्यक्ती रात्रीच्या वेळी बाहेर असते, कोण फक्त दोन तासांसाठी बाहेर जाऊन पुन्हा हॉटेलात जाऊन थांबते याची माहिती पोलीस घेतात.