
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत आहे. अशा परिस्थितीत ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादः संघर्ष आणि संकल्प’ हे पुस्तक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने इतके महत्त्वाचे आहे की, ते सर्वसामान्य मराठीजनांना सहज आणि स्वस्तात उपलब्ध व्हायला पाहिजे. म्हणून या पुस्तकाची जनता आवृत्ती शासनाने तातडीने प्रसिद्ध करावी आणि ही आवृत्ती किमान एक लाख प्रतींची असावी, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत निवेदन दिले आहे. महाराष्ट्र शासनाने 2021 साली ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद ः संघर्ष आणि संकल्प’ हा बृहद्ग्रंथ प्रसिद्ध केला होता. डॉ. दीपक पवार या पुस्तकाचे संपादक आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा समग्र आढावा घेणारा हा ग्रंथ शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध झाला. या पुस्तकात आपलेही मनोगत प्रसिद्ध झाले होते, अशी आठवणही देसाई यांनी या पत्रात करून दिली आहे.
मराठीजनांना पुस्तक सहज व स्वस्तात उपलब्ध करून द्या
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळतोय. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात, सीमाभागात आणि बृहन्महाराष्ट्रात हे पुस्तक मराठीजनांना सहज व स्वस्तात उपलब्ध होणे गरजेचे आहे. म्हणून या पुस्तकाची जनता आवृत्ती शासनाने तातडीने प्रसिद्ध करावी अशी मागणी सुभाष देसाई यांनी केली आहे.
ज्ञानाची लढाई लढणेही महत्त्वाचे
आपण महाराष्ट्र दिन, मराठी भाषा दिन साजरा करतो, पण जोपर्यंत संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत हे सर्व साजरे करणे अपुरे आहे या माझ्या भावनेशी आपणही सहमत व्हाल. राजकीय आणि न्यायालयीन लढाई आपण सीमाप्रश्नासाठी लढतच आहोत. पण त्याच बरोबरीने माहिती व ज्ञानाची लढाई लढणे आणि त्यात यशस्वी होणे हेही महत्त्वाचे आहे. यादृष्टीने जनता आवृत्ती हे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असेही देसाई म्हणाले.