
कोर्ट रूममध्ये ऑडिओ रेकार्ंडग करणे एकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. उच्च न्यायालयाने याची दखल घेतल्याने या गैरवर्तनाची भरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याची तयारी दर्शवण्यात आली.
न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाथा या खंडपीठाच्या कोर्ट रूममध्ये हा प्रकार घडला. सुनावणी सुरू असताना साजीद पटेल हे ऑडिओ रेकार्डिंग करत असल्याचे कोर्ट स्टाफच्या निदर्शनास आले. खंडपीठाने याची दखल घेतली. एका प्रकरणातील प्रतिवादींचे नातलग असल्याचे पटेल यांनी सांगितले. पहिल्यांदाच त्यांच्याकडून ही चूक झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करू नये, अशी विनंती अॅड. एच. एन. वेणेगावकर यांनी केली. मात्र या गैरवर्तनासाठी मी एक लाख रुपये कोर्टात जमा करण्यास तयार आहे, असे पटेल यांनी खंडपीठाला सांगितले. त्याची न्यायालयाने नोंद करून घेतली. एक लाख रुपये उच्च न्यायालय कर्मचारी वैद्यकीय कल्याण निधीत तीन दिवसांत जमा करावेत, असे आदेशही न्यायालयाने दिले.