ओरबाडले, डोके आपटले, चिमुरडीवर बलात्कार, तब्बल 28 टाके टाकले; मृत्यूशी झुंज

22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्हा 5 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने हादरला. दारूच्या नशेत एका नराधमाने या मुलीवर पाशवी बलात्कार केला. तसेच या मुलीला ओरबाडून, गुप्तांगावर आणि चेहऱ्यावर वार करून तसेच भिंतीवर डोके आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मुलीला अनेक ठिकाणी गंभीर आणि खोलवर जखमा झाल्याने तब्बल 28 टाके टाकावे लागले असून सध्या तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. दरम्यान, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने राज्यात प्रचंड संताप व्यक्त होत असून आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी होत आहे.

बलात्काराच्या घटनेनंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पीडितेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि तिला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी एका मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार आली. त्यानंतर दोन तासांनी हीच मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत एका घराच्या छतावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.

देशात महिला असुरक्षित खरगे

‘बहुत हुआ नारी पर वार’ अशी जाहिरात भाजपने केली होती, परंतु भाजपराज आणि भाजपच्या गुंडांमुळे पीडित महिलांचा आक्रोशच गेल्या दहा वर्षांपासून ऐकू येत आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. पुण्यात सरकारी बसमध्ये बलात्कार असो किंवा मणिपूर, हाथरसमध्ये आपल्या लेकीबाळी किंवा महिला ऑलिम्पिक चॅम्पियन असो, भाजपच्या राज्यात महिला असुरक्षितच आहेत, असे खरगे यांनी म्हटले आहे.