
तरुणीवरील अत्याचार जर भाजपच्या लोकांना सामान्य वाटत असेल, तर जनतेने यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारमधील असंवेदनशील मंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी या बेफिकीर राज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नाशिक येथे शुक्रवारी खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री संजय सावकारे, योगेश कदम यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला. पेंद्रात काँग्रेसचे सरकार असताना निर्भया कांड घडल्यानंतर भाजपने 21 दिवस संसद ठप्प केली. आम्हीही त्यात होतो. देशात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले याची आठवण करून दिली. तरुणीने स्ट्रगल केला नाही, हे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वक्तव्य असंवेदनशील आहे. भाजपच्या लोकांना अशा घटना सामान्य वाटतात. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहांना सांगून अत्याचाराला राजमान्यता द्या. जनतेने पोलीस कारवाईच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचे कारण नाही असे मुख्यमंत्र्यांनीच सांगावे, कॅबिनेटमध्ये तसा ठराव करावा, असा संताप त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षाने आवाज उठवल्यानंतर पोलिसांची फौज गुन्हेगाराच्या शोधासाठी फिरली, नाहीतर गृहराज्यमंत्र्यांनी पीडितेवरच जबाबदारी ढकलली होती, असेही ते म्हणाले.
गेल्या दहा वर्षांत देशात विकृती पसरली असून कायद्याची, पोलिसांची भीती राहिली नाही. छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर भाजपचा कार्यकर्ता आहे. तो सरकार, पोलिसांच्या मदतीशिवाय पळून गेला का? असा सवाल करीत गुन्हेगारांना मिळणाऱ्या राजाश्रयाकडे लक्ष वेधले.
या वेळी राज्य संघटक विनायक पांडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, उपजिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, योगेश घोलप आदी उपस्थित होते.