
ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांसाठी वाईट बातमी आहे. ईपीएफओने व्याजदरात कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही. व्याजदर 8.25 टक्के इतकेच ठेवण्यात आले आहेत. ईपीएफओची सीबीटीसोबत आज बैठक झाली. या बैठकीत व्याजदर जैसे थे ठेवण्यावर शिक्कामोर्तब झाले. याबाबतचा प्रस्ताव आता मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे.
ईपीएफ व्याजदर गेल्या काही वर्षांपासून कमीअधिक होत आहेत. 2021-22 मध्ये हेच दर 8.10 टक्के इतके होते. 1977-78 नंतरचे हे दर सर्वात कमी होते. त्यामुळे ईपीएफओच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती, परंतु यंदा व्याजदरात कोणतीही वाढ केली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी कायम आहे. 2022-23 मध्ये व्याजदर 8.15 टक्के होते. 2021-22 मध्ये 8.10 टक्के म्हणजेच गेल्या 40 वर्षांतील सर्वात कमी होते, तर 2020-21 मध्ये 8.50 टक्के आणि 2019-20 मध्ये 8.50 टक्के इतकेच होते.