नामदेव ढसाळ कोण… सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणी

दलित पँथर चळवळीचे प्रणेते व कवी ‘पद्मश्री’ नामदेव ढसाळ यांना कोण ओळखत नाही. त्यांच्या लेखणीने साहित्यात मोलाचे योगदान दिलेले आहे. नामदेव ढसाळ कोण, असा प्रश्न विचारून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करणाऱ्या सेन्सॉर बोर्डातील अधिकाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी कॉँग्रेसने केली आहे.

दलित पँथर आणि युवा क्रांती दल या चळवळीचा इतिहास सांगणाऱ्या ‘चल हल्ला बोल’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटात कविवर्य ‘पद्मश्री’ नामदेव ढसाळ यांच्या कवितांचा समावेश आहे. चित्रपटातील सर्व कविता काढून चित्रपट प्रदर्शित करण्याची अट सेन्सॉर बोर्डाने घातली आहे. तसेच नामदेव ढसाळ कोण? आम्ही त्यांना ओळखत नाही, असा उर्मट प्रश्न या अधिकाऱ्यांनी विचारला आहे. हा नामदेव ढसाळ व आंबेडकरी विचारांचा अपमान आहे. सरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांची यातून दलितविरोधी मानसिकता स्पष्ट दिसून येते. संबंधित अधिकाऱ्यांनी जाहीर माफी मागावी, असे कॉँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.

‘गोलपीठा’कार नामदेव ढसाळ यांच्या भाषेवर आक्षेप घेत त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘चल हल्ला बोल’ला परवानगी नाकारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. हा  एक प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद निर्माण केला जातोय. सेन्सॉर बोर्डात बसलेला तो कोण, काय त्याची लायकी, असा हल्ला जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. त्यांनी यावरून शुक्रवारी बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेटही घेतली.