केईएमच्या शताब्दी वर्षाचा प्रवेशद्वारावरील मजकूर इंग्रजीत; राज्य सरकार, पालिकेचा ‘इंग्रजी बाणा’

मुंबईत मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाहीर भाषणात ठासून सांगत असताना मुंबई पालिकेच्या केईएम रुग्णालयात मात्र राज्य सरकार आणि पालिकेचा ‘इंग्रजी बाणा’ पाहायला मिळत आहे. केईएम रुग्णालयाच्या शताब्दी वर्षासाठी तयार केलेल्या सर्व प्रवेशद्वारांवरील मजकूर इंग्रजीत ठेवून सरकारने मराठीचा अपमान केला आहे. इंग्रजी मजकुराचे प्रवेशद्वार उभारणे हा मराठी भाषेचा जाहीर अपमान नाही का, असा सवाल शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी विचारला आहे.

पेंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठय़ा जल्लोषात पेंद्राचे आभार मानले होते. मात्र, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळूनही तिची व्यवहारात होत असलेली अवहेलना सरकार आणि पालिकेला रोखता आलेली नाही. याचेच उदाहरण म्हणून परळच्या मऱहाटमोळय़ा परिसरात केईएमच्या प्रवेशद्वारावरील मजकूर चक्क इंग्रजी भाषेत लिहिला आहे.

…तर शिवसेनेने केईएमच्या प्रवेशद्वारांना काळे फासले असते!

दरदिवशी हजारो जणांना माफक दरात रुग्णसेवा देणाऱ्या मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष सुरू आहे. त्यामुळे मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा असा जाहीर अपमान करणाऱ्या राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेचा निषेध म्हणून रुग्णालयाच्या सर्व प्रवेशद्वारांना शिवसेनेने काळे फासले असते; पण त्याचवेळी आम्हाला केईएम रुग्णालयाची प्रतिष्ठाही जपायची आहे. केईएम रुग्णालयाच्या प्रतिष्ठेचा आम्ही मान राखतो म्हणूनच शिवसेनेने प्रवेशद्वारांना काळे फासले नाही. मात्र, पालिकेने तातडीने सर्व प्रवेशद्वारांवरील मजकूर मराठीत करावा, अशी मागणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी केली आहे.