
भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील न्यू ग्रेट ईस्टर्न मिलजवळच्या सेलटेक या 57 मजली गगनचुंबी इमारतीच्या 42 व्या मजल्यावर आज सकाळी साडेदहाच्या सुमाराला आग लागल्याने मोठी घबराट पसरली. खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीच्या लिफ्ट बंद ठेवल्याने मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांच्या समोर मोठी अडचण निर्माण झाली. मात्र दलाच्या 16 जवानांनी वेळ वाया न घालवता धावत 42 वा मजला गाठला आणि आग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले. सुमारे अडीच तासांच्या मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. सुदैवाने इमारतीतील रहिवासी वेळीच इमारतीबाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. घरात फर्निचरचे काम सुरू असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, या आगीमुळे पुन्हा एकदा गगनचुंबी इमारतींना लागणाऱया आगींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.