ठसा – दिलीप नाईक

>> प्रा.पृष्णपुमार गावंड

संगीतकारांच्या कम्पोझिशन्सना किंवा अरेंजर्सच्या प्रतिभेला न्याय देण्यासाठी योग्य वादकांची साथ असणे गरजेचे आहे. परंतु काही ज्येष्ठ वादक कलाकार प्रसिद्धविमुख राहिल्याने लोकांना परिचीत नाहीत. त्यापैकी एक वादक कलाकार म्हणजे ज्येष्ठ प्रतिभावान गिटारवादक दिलीप नाईक. दिलीप नाईक यांनी त्यांच्या साधारण 13 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये शेकडो चित्रपट गीतांमध्ये गिटारवादन केले आहे. संगीतकार शंकर जयकिशनपासून 1962 साली सुरू झालेली त्यांची कारकीर्द उत्तम सिंग यांच्यापर्यंत ऐसपैस पसरलेली आहे. 12 नोव्हेंबर 1942 ला जन्मलेला दिलीप सहा भावंडांमध्ये सर्वात लहान. संगीतवेडे आई-वडील आणि शास्त्राrय संगीत जाणणाऱया बहिणीमुळे दिलीपवर लहानपणीच सुरीले संस्कार झाले. छबिलदास शाळेमधील पी.टी. शिक्षक खांबेटे यांनी दिलीपला माऊथ ऑर्गन वाजवताना ऐकले आणि त्याला बोलावून व्हायोलिन, क्लॅरोनेट व मेंडोलिन यातील वाद्य निवडण्यास सांगितले. मेंडोलिनचा टोन न आवडल्याने आणि जगप्रसिद्ध गिटारिस्ट लेस पॉलची सॅन अॅटोनियो रेकाॅर्ड ऐकल्यामुळे दिलीपने गिटार निवडली. वडिलांनी 70 रुपये किमतीची जर्मन गिटार त्याला आणून दिली आणि त्यानंतर अनेक मित्रांच्या सहकार्यामुळे दिलीप यशाच्या पायऱया चढत गेला. दिलीपला गिटारचे मूलभूत शिक्षण देणाऱ्या मेरविन रोझारियो आणि त्याचा भाऊ विन्सेंट याच्याबरोबर त्यांनी एक बँड सुरू केला, ट्रंपेट वादक मॉझीमुळे दिलीपला दिग्गज अॅरेंजर सॅबेस्टियन यांच्याकडे जाण्याची संधी मिळाली. त्यांनी दिलीपची ऑडिशन घेऊन शंकर-जयकिशन यांच्या असली नकली चित्रपटातील ‘छेडा मेरे दिलने’ आणि ‘गोरी जरा हस दे तू’ या गाण्यासाठी अॅकोस्टिक गिटार वाजवण्यासाठी दिलीपला पाचारण केले. त्याचे कौशल्य पाहून शंकर-जयकिशन यांनी ‘बेटी बेटे’ चित्रपटातील ‘नैनोवाली तेरे नैना’ या रफी साहेबांच्या गाण्यासाठी इलेक्ट्रिक गिटार सोलो पीस वाजवण्याची दिलीपला संधी दिली, जे गाणे रेडिओवर सुपरहिट झाले. दिलीप नाईकांनी सर्वात जास्त गाणी शंकर-जयकिशन यांच्याकडे वाजवली हे अभिमानाने सांगतात. त्यातील खास ‘मै का करू राम’ (संगम), ‘आसमान से आया’, ‘रात के हमसफर’ (‘इव्हनिंग इन पॅरिस’), ‘जाने चमन’, ‘इस दुनिया मे’ (‘गुमनाम’), ‘जान पहचान हो’ला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. ‘अराऊंड द वर्ल्ड’च्या ‘जोशे जवानी’, ‘दिल लगाकर’मध्ये मेन मेलडी आणि ऑब्लिगॅटोचा ते खास उल्लेख करतात. याशिवाय ‘राजकुमार’, ‘सूरज’, ‘प्यार मोहब्बत’, ‘हरे काच की चुडिया’, ‘प्यार ही प्यार’ ही त्यांची आवडती गाणी, पण सर्वात आवडणारे समाधान देणारे गाणे म्हणजे ‘आजा रे आ जरा’ ( ‘लव्ह इन टोकियो’). ओ.पी. नय्यर यांच्या ‘हुजुरेवाला’, ‘मोहब्बत चीज है क्या’ (‘ये रात फिर ना आयेगी’), ‘हुए है तुमपे’ ( ‘मेरे सनम’), ‘नदी का किनारा’ (‘सीआयडी909’), ‘तू औरो की क्यूं’ (‘एक बार मुस्पुरा दो’) या गाण्यांबरोबर ‘किस्मत’मधील ‘लाखो है यहॉ’ आणि ‘आखो मे कयामत’ या गीतांचा खास उल्लेख करतात. कारण ‘किस्मत’मध्ये त्यांचा सहाय्यक संगीत निर्देशक म्हणून उल्लेख केला आहे. पंचमदांच्या ‘तिसरी मंझिल’मधील ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’मधील 24 सेकंदांचा इंट्रोडक्शन पीस तीनवेळा वाजवला आहे, ज्यात शंभर टक्के परफेक्शन आहे, हे दिलीप नाईक अभिमानाने सांगतात. याशिवाय पंचमदांकरिता ‘ये शाम मस्तानी’, ‘गुलाबी आँखे’, ‘चला जाता हूँ’, ‘प्यार हुआ है जबसे’, ‘सामने ये कौन आया’सारख्या अनेक गीतांमध्ये दिलीपजींची गिटार खणखणीतपणे वाजलेली आहे. अशा ज्येष्ठ कलाकाराला भेटण्याचा योग माझे मित्र, सध्याच्या काळातले सुप्रसिद्ध संगीत संयोजक अजय मदन यांच्यामुळे मला आला. माझं दैवत शंकर-जयकिशन यांच्या नावाचा 2025 चा पुरस्कार माझ्या ‘स्वरमुग्धा आर्टस्’ या संस्थेतर्फे दिलीपजींना द्यायचे निश्चित केलेआहे.