वजन कमी करण्यासाठी आरोपी महिलेला कारागृहामध्ये ठेवा, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या विधानाची कोर्टात चर्चा

सर्वोच्च न्यायालयात जामीन प्रकरणाची सुनावणी सुरू असताना आरोपी महिलेचे वजन जास्त आहे, असे तिच्या वकिलाने कोर्टात सांगितले. त्यावर न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आलंय. अशिलाचे वजन जास्त आहे, तेव्हा या आधारे महिलेला सोडायचे का, असा तिरकस सवाल न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी केला. तसेच महिलेला जेलमध्ये ठेवले तर तिचे वजन कमी होईल, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी याआधीही आपल्या वक्तव्याने चर्चेत आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जामीनाच्या प्रकरणात सुनावणी करता कामा नये, असा सल्ला त्यांनी एका खटल्यादरम्यान दिला होता. सर्वोच्च न्यायालय जामीन कोर्ट बनले आहे. जामीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करता कामा नये, हे माझे म्हणणे आहे, असे न्यायमूर्ती त्रिवेदी म्हणाल्या होत्या.