आकाशात सात ग्रहांचे दुर्मिळ मीलन; ‘स्टारमन’ने टिपली ग्रेट प्लॅनेटरी परेड

अंतराळप्रेमींसाठी आणि खगोलशास्त्राच्या अभ्यासकांसाठी एक ऐतिहासिक क्षण घडला आहे. 27 वर्षीय ब्रिटिश छायाचित्रकार जोश डय़ुरी ज्यांना ‘स्टारमन’ म्हणून ओळखले जाते, त्यांनी प्रथमच पृथ्वीसहित सूर्यमालेतील सातही ग्रहांचे एकाच फ्रेममध्ये छायाचित्रण करण्यात यश मिळवले आहे. ही दुर्मिळ खगोलीय घटना ‘ग्रेट प्लॅनेटरी परेड’दरम्यान घडली, ज्या वेळी सूर्यमालेतील आठही ग्रह एका सरळ रेषेत आले होते.

40 वर्षांनंतर घडलेली दुर्मिळ घटना

ही घटना 22 फेब्रुवारी रोजी घडली. तेव्हा जोश डय़ुरी यांनी इंग्लंडमधील सॉमरसेटच्या मेंडिप हिल्सवरून ग्रहांचे दुर्मिळ छायाचित्र घेतले. 1982 नंतर प्रथमच अशी घटना घडली होती, त्यामुळे हे छायाचित्र ऐतिहासिक ठरले आहे. ग्रहांच्या अशा प्रकारच्या संरेखनाला ‘ग्रेट प्लॅनेटरी परेड’ म्हणतात. यानंतर अशी परेड 2040 मध्ये घडेल, असे तज्ञांचे मत आहे.

एकाच फ्रेममध्ये सात ग्रह

जोश डय़ुरी म्हणाले, ‘‘मी सात ग्रहांचे एक पॅनोरामा छायाचित्र घेतले, जे नऊ वेगवेगळ्या छायाचित्रांचे संकलन आहे. यात शनी, बुध आणि नेपच्यून हे मंद प्रकाश असलेले ग्रह आहेत, जे सहज दिसत नाहीत. यासाठी मी विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला आणि विविध छायाचित्रे एकत्र करून एक विस्तृत प्रतिमा तयार केली.’’

विशेष तंत्रज्ञानाचा वापर

या दुर्मिळ छायाचित्रासाठी जोश डय़ुरी यांनी विशेष तंत्रज्ञान आणि तांत्रिक कौशल्य वापरले. बुध, शनी आणि नेपच्यून हे ग्रह पाहण्यासाठी अत्यंत कठीण असल्याने त्यांनी दोन वेगवेगळ्या एक्सपोजर तंत्रांचा वापर केला.