वेब न्यूज – पंच कैलास

>> स्पायडरमॅन

महाशिवरात्रीच्या निमित्ताने सोशल मीडियावर भगवान महादेव आणि त्यांचे निवासस्थान मानला जात असलेला कैलास पर्वत यांची चर्चा सुरू आहे. कैलास पर्वताबद्दल सुरू असलेल्या चर्चेत देशविदेशातील अनेक भक्त तसेच गिर्यारोहक, तज्ञ हे विविध ठिकाणी आपली मते नोंदवत आहेत आणि सामान्य लोकांना कैलासाबद्दल काही गोष्टी नव्याने घडत आहेत. कैलास-मानसरोवर यात्रा ही विख्यात आहे त्याप्रमाणे पंच कैलास नावाचीदेखील एक यात्रा असते. कैलास पर्वत, आदिकैलास, मणिमहेश, श्रीखंड महादेव आणि किन्नर कैलास अशी या पंच कैलासांची नावे आहेत. शंकराचे निवासस्थान मानला जाणारा कैलास पर्वत हा तिबेटमध्ये स्थित आहे. अनेक पुराणांमध्ये उल्लेख असलेल्या कैलास पर्वताच्या वर स्वर्ग आणि खाली मृत्युलोक आहे अशी मान्यता आहे. आदिकैलास हा हिंदुस्थान-तिबेट सीमेच्या जवळ हिंदुस्थानी क्षेत्रात आहे. माता पार्वतीशी विवाह करण्यासाठी शंकर वरात घेऊन आले होते तेव्हा त्यांनी येथे निवास केला होता अशी श्रद्धा आहे. आदिकैलासला शिव कैलास किंवा छोटा कैलास म्हणूनदेखील ओळखले जाते. हिमाचल प्रदेशातील चंबा जिह्यामध्ये मणिमहेश पर्वत आहे. हा पर्वत महादेव शंकराने त्याच्या विवाहापूर्वी निर्माण केला असे मानले जाते. श्रीखंड कैलास हिमाचलमधील कुल्लू जिह्यात आहे. पौराणिक कथांनुसार भगवान विष्णूने या ठिकाणी शंकराकडून वरदान प्राप्त झालेल्या भस्मासुराचा वध केला होता. या पर्वताची यात्रा अत्यंत कठीण मानली जाते, तर हिमाचलमध्येच असलेल्या किन्नौर जिह्यात किन्नर कैलास पर्वत आहे. या परिसरात असलेल्या सरोवराला पार्वती सरोवर म्हणून ओळखले जाते. माता पार्वतीने पूजेसाठी या सरोवराची स्वतः निर्मिती केली अशी मान्यता आहे. श्रीखंड कैलासावर नैसर्गिक शिवलिंग असून ते दिवसातून अनेकदा आपला रंग बदलते असे भक्त सांगतात. इथे ब्रह्मकमळेदेखील मोठ्या प्रमाणावर आढळतात. हिवाळ्यात इथे बर्फदेखील पडतो. मात्र या बर्फाने किन्नर कैलास कधीही पूर्ण आच्छादला जात नाही.