घरी जाऊन खतम करू… इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी, गृहखाते पुन्हा बघ्याची भूमिका घेणार काय?

भाजपशी संबंधित नागपुरच्या प्रशांत कोरटकरकडून जिवे मारण्याची दिलेली धमकी ताजी असतानाच, आता पुन्हा एकदा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका यूट्युब चॅनेलवरील कॉमेंटमध्ये केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली आहे. सावंत माजला आहे. काही दिवसांचा पाहुणा आहे. सावंतच्या घरी जाऊन खतम करू अशा शब्दांत त्यांने धमकी दिली आहे. त्यामुळे आतातरी गृहखाते तातडीने कारवाई करणार की पुन्हा एकदा बघ्याची भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तीन दिवसांपूर्वी नागपूरच्या प्रशांत कोरटकर नावाच्या माथेफिरूने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना ठार मारण्याची धमकी देत, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक भाषा वापरली होती. तसेच जेम्स लेनचे उदात्तीकरण करण्यासह मराठा समाजालाही आव्हानात्मक भाषा वापरल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळत आहे. या धमकी प्रकरणी इंद्रजित सावंत यांनी कोल्हापुरात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच आपला मोबाईल सुद्धा पोलीस ठाण्यात जमा केला आहे. पण एकीकडे हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे सांगणाऱ्या गृहखात्याने सावंत यांना सुरक्षा पुरवण्याऐवजी चक्क धमकी देणाऱ्या माथेफिरू कोरटकरलाच सुरक्षा पुरवली. त्यातूनही कोरटकर पोलीस ठाण्यात हजर होण्याऐवजी पळून गेला.

छत्रपतींच्या विषयी जातीय विष पेरणाऱ्या कोरटकर विरोधात ठिकठिकाणी कारवाईसाठी आंदोलने होत आहेत. येत्या 6 मार्च पर्यंत जर कोरटकरला अटक करून कारवाई केली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोल्हापूर दौऱ्यावेळी अडवून जाब विचारु, प्रसंगी कोल्हापूर बंद ठेवण्याचा इशाराही इंडिया आघाडीसह शिवप्रेमी संघटनांकडून देण्यात आला आहे.

दरम्यान एकीकडे मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन धमकी देऊन फरार झालेल्या माथेफिरू कोरटकरमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असताना, त्यात आता केशव वैद्य नावाच्या व्यक्तीकडून एका युट्यूबवरील कमेंटमधून देण्यात आलेल्या धमकीची भर पडली आहे.

विचारवंतांच्या हत्येसाठी पुन्हा एकदा अदृश्य शक्ती कार्यरत?

अंनिसचे नरेंद्र दाभोळकर,कॉम्रेड गोविंद पानसरे, प्राचार्य कलबुर्गी तसेच पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या मारेकऱ्यांना अजून शिक्षाही झालेल्या नाहीत. त्यामुळे विचारवंतांच्या हत्येसाठी पुन्हा एकदा अदृश्य शक्ती कार्यरत झाल्याची शक्यता यानिमित्ताने काही लोकप्रतिनिधींकडून उघड उघड व्यक्त केली जाऊ लागली आहे. त्यामुळे याबाबतीत गृहखाते बघ्याची भूमिका घेणार का अशी विचारणा होऊ लागली आहे.