लिंबमधील बारा मोटेची विहीर तीनशे वर्षांनंतरही दिमाखात

जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणारी तसेच वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली सातारा जिल्ह्यातील लिंब येथील बारा मोटेची विहीर आजही दिमाखात उभी आहे. तीनशे वर्षांपूर्वी बांधलेली ही चिरेबंदी विहीर ग्रामस्थांची बारमाही तहान भागवत आहे. सातारा जिल्ह्यातल्या लिंब गावात असलेली ‘बारामोटेची विहीर’ हे एक प्रसिद्ध ठिकाण. 1719 ते 1724 दरम्यान शाहू महाराजांची पत्नी वीरुबाई यांनी

ही दगडी विहीर बांधल्याचे सांगितले जाते. जवळपास 100 फूट खोल आणि 50 फूट व्यासाची ही विहीर गावकऱ्यांसाठी आजीवन पाण्याचा उत्तम स्रोत ठरली आहे. विहीर निर्माण करतेवेळी 3300 आंब्याची कलमे लावून इथे आमराईची निर्मिती करण्यात आली होती.

पेशव्यांच्या, शाहूंच्या अनेक खासगी बैठकांची साक्षीदार असलेली ही विहीर प्रसिद्ध झाली, ती तिच्या भिंतीवर कोरलेल्या व्याल आणि शलभ शिल्पांमुळे. व्याल म्हणजे वाघाचे तोंड आणि सिंहाचं शरीर. ही शिल्पं राज्याची समृद्धी आणि पराक्रमाचं प्रतीक ठरतात.

विहिरीच्या दक्षिण दिशेला 4 हत्तींवर आरूढ झालेल्या वाघाचं शिल्प दक्षिणेतील मराठ्यांचे वर्चस्व प्रदर्शित करते आणि उत्तरेकडे असलेली झेपावणारी व्याघ्घ्रशिल्पं पुढच्या उत्तरेकडील मोहिमेचा संकेत देतात. अष्टकोनी विहिरीच्या प्रत्येक कोनात नागदेवतेची मूर्ती आहे. विहिरीतील खासे बैठकीत कमळ, हत्ती, गणपती, मारुती ही शुभ चिन्हं चितारली आहेत.

वास्तुकलेचा अद्भूत नमुना

सातारा जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वास्तू उभ्या असून, त्यांची कितीं सातासमुद्रापार पोहचली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नुकतीच ही विहीर पाहिली. इतिहास जाणून घेतला. वास्तुकलेचा अद्भूत नमुना असलेल्या विहिरीबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.