
वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावी विज्ञान शाखेचा जीवशास्त्राचा पेपर सुरू असताना अश्विनी लाठकर (शिक्षणाधिकारी, माध्यमिक) जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या भरारी पथकाने भेट दिली. केंद्रावर मोठ्या प्रमाणात परीक्षा उपयोगी साहित्य, गाईड, स्पार्क गाईड, मायक्रो झेरॉक्स, नवनीत इतर साहित्य इमारतीच्या बाजूस व एका विद्यार्थ्याकडे आढळून आल्याने पथकाने संस्था अध्यक्ष व सचिव तसेच केंद्र संचालक व 15 पर्यवेक्षक यांच्यासह संबंधित विद्यार्थ्यावर कॉपी गैरमार्गप्रकरणी कारवाई केली आहे. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फुलंब्री येथील पिंपळगाव वळण येथील प्रकरण ताजे असतानाच शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने आज वैजापूर येथील कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालय, निमगाव येथे अचानक भेट दिली.
या भेटीदरम्यान पथकास इमारतीच्या आजूबाजूला परीक्षा दालनाबाहेर कॉपी तसेच परीक्षा उपयोगी साहित्य, गाईड, मायक्रो, झेरॉक्स इत्यादी गैरप्रकारातील साहित्य आढळून आले. पथकाने केंद्रात प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनाबाहेर कॉप्यांचा वर्षाव केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शाळेचे प्रशासन, केंद्र संचालकांसह 15 पर्यवेक्षक यांनी विद्यार्थी तपासणी अक्षम्य दुर्लक्ष केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच जीवशास्त्राच्या पेपरसाठी नवनीत गाईड कॉपी म्हणून बाळगल्या प्रकरणी एका विद्यार्थ्यांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी संस्था अध्यक्ष, सचिव, केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांच्यावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अध्यक्ष विभागीय शिक्षण मंडळ यांच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्या आदेशावरून गटशिक्षणाधिकारी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारावीच्या जीवशास्त्र विषयाच्या पेपरला कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालय निमगाव (तालुका वैजापूर) येथे शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने भेट दिली असता या परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक, पर्यवेक्षक तसेच अध्यक्ष व सचिव यांनी परीक्षा संचलन कर्तव्य सूचीमधील नमूद कर्तव्यात कसूर तसेच शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली. एका विद्यार्थ्यांवर कॉपी गैरमार्ग प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे, असे जिल्हा परिषद (शिक्षणाधिकारी) माध्य अश्विनी लाठकर यांनी सांगितले.
‘कल्पतरू ‘त एकही स्थानिक विद्यार्थी नाही
कल्पतरू शिक्षण संस्थेच्या या महाविद्यालयात निमगावच काय पण पंचक्रोशीतल्या गावातील विद्यार्थीही शिक्षण घेत नाही. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून या महाविद्यालयात जास्त मार्काचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. बहुतांश विद्यार्थी हे खासगी कोचिंग क्लासेसमधील आहेत. निमगाव परिसरातील एकाचे छत्रपती संभाजीनगरात खासगी क्लासेस आहेत. या क्लासेसमधील बहुतेक विद्यार्थी ‘कल्पतरू’चे परीक्षार्थी आहेत.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे
अजीनाथ काळे (आचार्य, कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालय, निमगाव) व्ही.एस. काटे, सी.यू. जाधव, एस.बी. गुजाळ, के. के. घाटवळे, एच. बी. खंडीझोड, जे. डी. कुदे, आर.बी. जाधव, व्ही. जी. पवार, जी. एस. डरले, ए.एस. निकम, आर. व्ही. कुन्दड, के. एस. सोनवणे, आर.बी. नराडे, एस.एस. आहेर (पर्यवेक्षक), जी. एस. पवार (अध्यक्ष), वैशाली पवार (सचिव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ओगले करीत आहेत.