मुलाला कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्रात प्रवेश, निलंबित नायब तहसीलदाराचा प्रताप

आपल्या मुलाला कॉपी देण्याच्या उद्देशाने एका निलंबित नायब तहसीलदाराने आपल्याकडे असलेल्या शासकीय ओळखपत्राचा दुरुपयोग करत बेकायदेशीररीत्या परीक्षा केंद्रात प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. 28) उघडकीस आला. सामाजिक कार्यकर्ते हरिहर गर्जे व किसन आव्हाड यांनी हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

अनिल तोरडमल असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. केंद्र संचालक शिवाजी दळे यांनी याबाबत फिर्याद दिली. अनिल तोरडमल याचा मुलगा बारावीची परीक्षा पाथर्डी शहरातील एका परीक्षा केंद्रात देत आहे. परीक्षा सुरू झाली तेव्हापासून तोरडमल हा आपल्या मुलासोबत परीक्षा केंद्रात येत होता. त्याच्याकडे असलेल्या शासकीय ओळखपत्रामुळे त्याला कोणी मज्जाव केला नाही.

गुरुवारी जीवशास्त्राचा पेपर चालू असताना केंद्रावर बंदोबस्तास असलेले पोलीस उपनिरीक्षक गुट्टे यांना तोरडमल यांच्यावर संशय आल्याने त्यांनी याची माहिती दळे यांना दिली. नंतर दळे यांनी तोरडमल यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर आपण अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार असून, आपला मुलगा परीक्षा देत असल्याने या ठिकाणी आल्याचे सांगितले. या घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे परीक्षा केंद्रात दाखल झाले. याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.