
चंदगड तालुक्यात अवैध खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याकडे शिवसेनेने लक्ष वेधूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने येथील निसर्गसंपदेची हानी होत असून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. यापुढे प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर शिवसेना रस्त्यावर उतरून अवैध खनिज उत्खनन करणाऱ्यांना धडा शिकवेल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला.
कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख दिलीप माने, युवासेना जिल्हा युवाअधिकारी अवधूत पाटील, आजरा तालुकाप्रमुख युवराज पोवार, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, शहरप्रमुख प्रकाश रावळ आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, चंदगड तालुक्यातील अवैध खनिज उत्खननामुळे होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास यासंदर्भात सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेने गडहिंग्लज येथे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर राजगोळी बु. येथे जिल्हा खनिकर्म व महसूल विभाग यांच्या संयुक्त पथकाने दहा डंपर जप्त करून कारवाई केली होती. मात्र, ही कारवाई गुलदस्त्यातच राहिली. जंगमहट्टी धरणाकडील दक्षिण परिसर आणि माडवळे, हाजगोळी, म्हाळुंगे, कोलिक, इब्राहिमपूर, चितळे, हिंडगाव येथे बॉक्साइटचे उत्खनन सुरू आहे. यामुळे येथील निसर्गसंपदेवरच घाला घातला जात आहे.
चोरवाटेने बॉक्साइटची वाहतूक कर्नाटकात केली जात आहे. या उत्खननामुळे शेतीदेखील धोक्यात येणार आहे. त्यामुळे गौण खनिज उत्खननाला पायबंद घालण्याची गरज आहे. याबाबत प्रशासनाने ठोस कृती न केल्यास शिवसेनाच रस्त्यावर उतरून अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांना धडा शिकवेल, असा इशारा निवेदनातून दिला आहे.