
जर्मनीतील हॅम्बुर्ग येथील लिंबू उत्पादक व डॉ. लिकन कंपनीचे मालक अँड्रेस शिंडलर यांनी पुणे बाजार समितीला भेट देत लिंबाच्या व्यापाराबाबत माहिती घेतली. परदेशी लिंबाला हिंदुस्थानात विक्रीस पाठविल्यावर काय परिस्थिती राहील यादृष्टीने लिंबाची आवक, जावक, निर्यात, विक्री, मागणी आदी गोष्टींचा आढावा घेतला.
हिंदुस्थानी बाजारपेठ जगासाठी कायमच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. तसेच येथील बाजारपेठेत सर्व प्रकारचा माल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे या बाजारातून माल खरेदीसह विदेशातील माल या बाजारपेठेत पाठविण्यासाठी नेमके काय काय करावे लागेल. विक्रीच्या दृष्टीने मालाची आदान-प्रदान करणे शक्य आहे का? याचाही अंदाज घेण्यासाठी अँड्रेस शिंडलर यांनी पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डातील फळबाजारातील लिंबाचे आडतदार रोहन जाधव यांच्या विलास दिनकरराव जाधव गाळा नंबर ७४ या गाळ्यावर यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी लिंबाचा दैनंदिन बाजार कसा चालतो. आवक कशी होते. विक्रीची प्रक्रिया, मिळणारा दर, निर्यातीची व्यवस्था आदी गोष्टी जाणून घेतल्या. यावेळी लिंबाचे आडतदार रोहन जाधव, मिलिंद जाधव, फळांचे आडतदार रोहन उरसळ आदी उपस्थित होते.
याबाबत लिंबाचे आडतदार रोहन जाधव म्हणाले, अँड्रेस शिंडलर हे एका कंपनीचे मालक असून, स्वतः लिंबू उत्पादक आहेत. पुण्यातील मार्केटयार्डातील बाजारावर त्यांचे लक्ष आहे. या बाजारपेठेत लिंबासह विविध प्रकारच्या फळांना खूप मागणी असते. त्यामुळे विदेशातील लिंबे आणि फळे या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविता येतील का? याचा अंदाजही शिंडलर यांनी घेतला. जर्मनची लिंबे पुण्यात पाठविली तर काय दर मिळेल किंवा किती प्रमाणात लिंबे पाठवावी लागतील. याबाबत शिंडलर यांनी आढावा घेतला.