बिहारमध्ये पोस्टिंग मिळाल्याने शिक्षिकेचा संताप, आक्षेपार्ह भाषा वापरल्याने गमावली नोकरी

बिहारमधील जहानाबाद येथील केंद्रीय विद्यालयातील एका शिक्षिकेला बिहार आणि हिंदुस्थानातील इतर देशांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. दीपाली शहा असे या शिक्षिकेचे नाव असून तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने तिच्या पोस्टिंगच्या ठिकाणावर टीका केली आहे. तेथील लोकांचे वर्णन करताना तिने आक्षेपार्ह भाषा वापरली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षिका दीपाली शहा मूळची पश्चिम बंगालची आहे. तिची नियुक्ती बिहारमधील जहानाबाद येथील केंद्रीय विद्यालयात झाली आहे. दीपाली शहा ही विद्यालयाच्या प्राथमिक विभागात इंग्रजी शिकवते. तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होत आहे. ज्यामध्ये तिने बिहार आणि बिहारमधील लोकांसाठी आक्षेपार्ह भाषा वापरली. मला इतर कोणत्याही राज्यात का पाठवले नाही, असा प्रश्न तिने विचारला आहे. “मला जहानाबादसारख्या जिल्ह्यात का पोस्टिंग दिली? मला लडाख, गोवा, दक्षिण किंवा इतर कोणत्याही राज्यात पोस्टिंग देता आली असते. हिंदुस्थानात बिहारचा समावेश असल्याने हिंदुस्थान विकसित राष्ट्र बनू शकला नाही, असे वादग्रस्त विधान तिने केले.

दरम्यान, सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बिहारच्या खासदार शांभवी चौधरी यांनी केंद्रीय विद्यालय संघटनेच्या आयुक्तांना पत्र लिहून शिक्षिकेविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. या पत्रातून त्यांनी शिक्षिकेच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. अशी विधाने अत्यंत चूकीची आणि विद्यार्थ्यांना ज्ञान देणाऱ्या शिक्षकांसाठी अयोग्य आहेत, असे चौधरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच त्यांनी दीपाली शहा विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही केली.

शिक्षिकेचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शाळेत शिकणाऱ्या मुलांनी त्यांच्या कुटुंबियांसह आणि शहरातील लोकांनीही संताप व्यक्त केला. दरम्यान, जिल्हा दंडाधिकारी आणि केंद्रीय विद्यालयाच्या अध्यक्ष अलंकृता पांडे यांनीही तत्काळ या प्रकरणाची दखल घेतली. व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासली जाईल आणि या प्रकरणात कारवाई केली जाईल, असे त्या म्हणाल्या. यानंतर चौकशीदरम्यान शिक्षिकेचा हा व्हिडिओ खरा असल्याचे आढळून आले. त्यामुळे दीपाली शहावर निलंबनाची ही कारवाई करण्यात आली.