डाएट करूनही वजन कमी होत नाहीये, मग या चुका टाळा!

सध्याच्या घडीला आपल्या कामाच्या पद्धती बदलल्यामुळे वजनवाढीच्या समस्येला सामोरे जावे लागते. परंतु वजन वाढल्यानंतरचा सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे, डाएटचा. डाएट करुनही वजन कमी होत नाही ही समस्या सध्याच्या घडीला अनेकांना भेडसावते. यामागचं नेमकं कारण काय, तर चुकीच्या पद्धतीने केलेल्या डाएटमुळे वजन कमी तर होतच नाही. चुकीच्या पद्धतीने केलेल्या डाएटमुळे, वजनवाढण्याची समस्या अधिक पटीने वाढणार.

 

 

आपले शरीर बेढब दिसू लागल्यावर, आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट करतो ती म्हणजे वजन कमी करण्याची. वजन कमी करताना आपण अनेकदा घाईघाईत निर्णय घेतो. कालांतराने वजन कमी होते. परंतु हे वजन पुन्हा वाढते कसे हेच आपल्याला कळत नाही. वजन कमी करताना आपण नकळतपणे काही चुका करतो. त्या चुकाच आपल्याला कळत नाहीत. त्यामुळे वजन कमी करताना काही गोष्टींची काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे.

 

तुम्हाला असे वाटत असेल की, कमी खाल्याने तुमचे वजन कमी होईल. तर हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. कमी-कॅलरीयुक्त आहार घेतल्याने सुरुवातीला वजन कमी होण्यास मदत होते. परंतु कालांतराने मात्र वजन वाढण्यास सुरुवात होते.

 

आपल्या आहारातून प्रथिने, कार्बोहायड्रेट्स हे घटक एकदम वगळू नका. त्यामुळे नंतर पटकन वजन वाढते. परिपूर्ण आहार हा आपल्या रोजच्या जेवणात समाविष्ट करायला हवे. जीवनसत्त्वे,  खनिजे,  फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची असतात. वजन कमी करताना उगाचच जास्त व्यायाम केल्याने वजन कमी होत नाही. तर नियमित वर्कआउट्स तुमचे वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावते.

 

केवळ डाएट करतोय म्हणून, फार काळ एका जागेवर बसणे टाळा. तुम्ही जास्त वेळ एकाच जागी बसल्यामुळे, तुमचे शरीर फॅट-ब्लॉकिंग एंजाइम तयार करणे थांबवते. त्यामुळे तुमचे वजन अधिक वाढते. म्हणूनच वजन कमी करण्याच्या पद्धतीमध्ये डाएट आणि व्यायाम या दोन्हींची महत्त्वाची भूमिका आहे.

(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)