
दुसऱ्या मुलीसोबत बोलत असलेल्या प्रियकरावर अल्पवयीन प्रेयसीने चाकूने वार केल्याची थरारक घटना घणसोली रेल्वे स्थानकासमोर बुधवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात प्रियकराच्या कानाला, चेहऱ्याला, गळ्याला आणि हातांना गंभीर दुखापत झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या प्रियकराला कोपरखैरणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
घणसोली येथील सेक्टर 4 मधील अण्णासाहेब पाटील सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाचे ठाणे शहरातील वागळे इस्टेट भागातील कादंबरी चाळीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध आहेत. हा तरुण बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घणसोली रेल्वे स्थानकाबाहेर सेंट्रल पार्कसमोर अन्य एका तरुणीबरोबर बोलत उभा होता. त्याचवेळी ही अल्पवयीन प्रेयसी तिथे आली.
या मुलीबरोबर तू का बोलत आहे, अशी विचारणा करून तिने त्याला थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र त्याने तिला प्रतिकार केला. त्यामुळे या मुलीने स्वतःच्या पर्समध्ये लपवलेला चाकू बाहेर काढला आणि प्रियकराच्या चेहऱ्यावर, कानावर आणि गळ्यावर सपासप वार केले. हा हल्ला चुकवण्याच्या प्रयत्नात त्याच्या हातांनाही गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले.